पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आणि शिवसेना गटनेते ‘वंदेमातरम’ च्या मुद्द्यावरून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत . काही महिन्यापूर्वी सर्व पक्षीय असलेल्या पक्षनेत्यांच्या सभेत सेनेचा ‘ महापालिका शाळेत वंदेमातरम व्हावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावावी असा विषय मंजूर केला होता. प्रथम तो पुढे ढकलण्यात आला आणि नंतर तो मंजूर करण्यात आला .पक्षनेत्यांच्या सभेतून थेट महापालिकेच्या मुख्य सभेत गेल्या १० नोव्हेंबर ला मंजुरीसाठी आला .तेव्हा विशेष म्हणजे कॉंग्रेसचे एकमेव सदस्य उपस्थित होते .ते म्हणजे स्वतः गटनेते अरविंद शिंदे …. तर राष्ट्रवादीचे 3 सदस्य उपस्थित होते . वंदेमातरम चा विषय मुख्य सभेत चर्चेला येणार असल्याचे खरे तर शिवसेना गटनेते ,कॉंग्रेस गटनेते यांनाच ठाऊक होते . पण कॉंग्रेसचे अन्य नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे अन्य नगर सेवक या सभेला उपस्थित होते पण हा विषय चर्चेला येण्यापूर्वीच निघून गेले होते .
या सभेत अरविंद शिंदे यांनी हा प्रस्ताव येताच ‘ वंदेमातरम ची सक्ती नसावी याबाबत ऐच्छिकता असावी ‘ अशा स्वरूपाची उपसूचना दिली . यास राष्ट्रवादीचे योगेश ससाणे यांनी अनुमोदन दिले . मात्र शिवसेनेचे गटनेते भोसले यांनी या उपसूचनेला विरोध केला आणि मतदान झाले . यावेळी चक्क उपसुचनेच्या बाजूने कॉंग्रेस चे एकट्या अरविंद शिंदे यांचे मत आणि राष्ट्रवादीची 3 अशी केवळ 4मते पडली . तर विरोधात भाजपा सेनेची ३७ मते पडली . त्यामुळे उपसूचना फेटाळण्यात आली . आणि सेनेचा मूळ प्रस्ताव देखील अशाच मताधिक्यांनी मंजूर करण्यात आला .
दरम्यान भोसले आणि शिंदे हे दोघेही एकाच विधानसभा मतदार संघात आपापल्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे .