पुणे-बनावट दारू ,भेसळयुक्त तेल तूप , मिठाई अशा अनेक प्रकारांनी ग्राहक गंडवला जात असताना आता बाजारात सिमेंट देखील भेसळयुक्त नाही, तर चक्क बनावट सिमेंट बाजारात विकले जात असल्याचा प्रकार पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे उघडकीस आला आहे .घर पहावं बांधून ..अशी मनोकामना प्रत्येकाची असते , या मनोकामने वर अशा वृत्तांनी सावट येणे साहजिक आहे . पण जे काम ग्राहक चळवळीने करायला हवे , ग्राहक पंचायतीने करायला हवे ते पोलिसांनी केल्याने ,पुण्यातील ग्राहक चळवळ संपुष्टात आल्याचे दिसू लागले आहे .
हडपसर सातवनगर हांडेवाडी रोडवरील बनावट सिमेंट तयार करणारा अड्डा संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने उध्वस्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना जणांना अटक केली आहे. आरोपी बिर्ला कंपनीच्या रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात बनावट सिमेंट भरून हे सिमेंट ग्राहकांना विकायचे.
पोलिसांनी येथील चौधरी इंटरप्रायजेस या सिमेंट विक्री करणा-या गोडावूनवर छापा टाकून मालक अन्वर हुसेन शेख (वय 50) मॅनेजर रमाकांत राजकुमार पांडे (वय-40), कामगार श्यामकुमार कल्लू कोळी (19), अमरनाथ रामखिलावत कोळी (वय-34) आणि शिवपूजन भोलुप्रसाद प्रजापती (वय-40) या पाच जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता आठ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी छापा टाकला असता आरोपी हा सिमेंट बिर्ला सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात वेगळेच सिमेंट भरून ग्राहकांची फसवणूक करताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून 1603 बनावट सिमेंटच्या गोण्या, दोन टाटा आयशर टेम्पो आणि इतर साहित्य असा 19 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उप निरीक्षक पी.डी.गायकवाड, कर्मचारी नरेंद्र सोनावणे, राज देशमुख, रमेश भिसे, प्रदीप शेलार, भालचंद्र बोरकर, हजरत पठाण, अतुल मेंगे, तानाजी गाडे, विठ्ठल बंडगर, किरण चोरगे, दत्ता फुलसुंदर, कांतीलाल बनसुडे, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.