पुणे-शहरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलातर्फे पोलीस काका हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक शाळेसाठी एक वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या-त्या शाळात आणि महाविद्यालयात त्या पोलीस काकांचा मोबाईल क्रमांक आणि फोटो प्रथमदर्शनी भागात लावण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी एसपी महाविद्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन होईल.
बऱ्याचदा शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना छेडछाड, दादागिरी, रॅगिंग या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारच्या वाढत्या समस्यांना आळा घालण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 1180 शाळा व महाविद्यालय असून यामध्ये 10 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात.