पुणे- राजकीय अंकुश उरला नसल्याने महापालिकेतील आणि एकंदरीतच पुण्यातील प्रशासनाकडून भाजपच्या नगरसेवकांना आपापली कामे करवून घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत . त्या सोडविण्यासाठी त्यांना पक्ष पातळीवरून कोणाचीही भक्कम साथ मिळत नाही . आमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हाला तकड देण्यासाठी खमक्या नेता हवा अशी भावना वैतागलेल्या नगरसेवकांकडून व्यक्त होते आहे . एकीकडे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्यात नेतृत्वाची लढाई सुरु असताना , पुण्याचे नेतृत्व थेट मुख्यमंत्र्यांकडे आहे अशी भावना पसरली असताना स्थानिक पातळीवर नवीन आणि जुन्या देखील नगरसेवकांची मोठी पंचाईत होताना दिसते आहे .
अगदी छोटी छोटी कामे सुद्धा होत नाहीत हि तक्रार खुद्द सत्ताधारी भाजपा नगरसेवक करीत आहेत . आम्हाला जाहीर पणे बोलता येत नाही ,पण आता खाजगीत तरी ओरड सुरु झाली आहे . प्रत्येक ठिकाणी अडचणी सांगण्यात येतात . मग कोणतेच काम होत नाही अशी स्थिती असल्याने ,कशाला नगरसेवक झालो अशी भावना अनेकांची आहे . महापालिका प्रशासन , बजेट , कायदे आणि असंख्य अडचणी सांगून टोलवाटोलवी करीत आहे . अशी अवस्था असल्याने पदाधिकाऱ्यांकडे जावे तर ते प्रथम वेळ मारून नेतात नंतर त्यांच्याच सुरात सूर मिसळून स्वतःच्या कामात मग्न होत आहेत . भाजपच काय राष्ट्रवादीच्या अनेक नवीन नगरसेवकांची ही अशी गोची होत आहे . पण राष्ट्रवादीला नेता आहे . आणि भाजपला नेता आहे कि नाही ? अशी स्थिती आहे . कार्यकर्त्यांना चहा पाजू शकत नाहीत, असे निष्ठावान अन्य पक्षांच्या नेत्यांच्या गळ्यात गले घालून स्वपक्षीयांना झुलवत आहेत . कोणी तरी एकच सुरेश कलमाडी सारखा दरारा असेल असा खमक्या नेता लागतो तेव्हा कामे होतात ..पण आमच्याकडे खमक्या नेताच उरला नाही .. बापटांना वेळ नाही , अन नानांना सांगावे तर ते म्हणतात , मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो .. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची क्षमता असणारा आणि स्वतःचा दरारा ठेवू शकेल असा नेता नाही हे खरे आमचे दुखणे आहे . असे म्हणणे मांडले जावू लागले आहे. मदतीला आणि ताकद द्यायला विनंती केली तर ‘ वरचेवर हो हो म्हटले जाते , पण कशासाठी ताकद द्यायची ? लढू द्यात त्याचे त्याला .. अशी मूळ भावना असते .
९८ नगरसेवक असलेल्या भाजपची अशी अवस्था आहे . तर अन्य पक्षातही अनेक नवीन नगरसेवकांची याहून वेगळी अवस्था नसल्याचे सांगण्यात येते .