पुणे- आजकाल पैसा व स्वार्थ याच्यामुळे विवेक आणि माणुसकीच्या भावना बोथट झाल्या आहेत अशी खंत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केली. प्रिंट, इलेक्ट्रोनिक्स आणि सोशल मिडीयाने केवळ टीका करण्यापेक्षा लोकांच्या मनातील विवेक, नितीमत्ता आणि सहृदयता जागृत करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत दिला जाणारा यंदाचा महर्षी पुरस्कार पद्मश्री प्रतापराव पवार यांना प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.माजी
आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, सौ. भारती पवार, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर , नगरसेवक आबा बागुल. पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घन:शाम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे,अमित बागुल, राजेंद्र बागुल, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, चांदीची श्री महालक्ष्मीची मूर्ती, मानपत्र असे या पुरस्क्राचे स्वरूप आहे.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, आपण भ्रष्टाचाराबद्दल दररोज अनेक गोष्टी ऐकतो. भ्रष्टाचार करणार्यांना पकडले जाते, त्यांना शिक्षा होते हे जरी खरे असले तरी, गरीब, दिनदुबळ्या, लुळ्या, पांगळ्या लोकांना तसेच परित्यक्त्या महिलांना जे काही थोडेफार सरकारकडून अनुदान मिळते
त्याच्यासाठीही पैसे मोजावे लागतात ही दुर्दैवाची बाब आहे. एवढेच नाही तर दुध, भाज्या, मसाला, अन्न. अशा विविध खाद्य पदार्थांमध्ये सर्रास भेसळ केली जात आहे. यावरून असे लक्षात येते की पैसा आणि स्वार्थ यापुढे लोकांच्या विवेक व माणुसकीच्या भावना बोथट झाल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या मनातील विवेक जागृत करण्याची आवश्यकता आहे.
प्रतापराव पवार हे संयमी, सुसंस्कारीत, मितभाषी , कर्तुत्ववान अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे असे गौरोद्गारही त्यांनी काढले. अशी व्यक्तिमत्व ही आपल्या कार्यातून समाजाला सृजनशील करतात असे सांगून पाटील म्हणाल्या प्रतापराव पवार हे वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूज पेपर या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी हैद्राबाद येथे कॉन्फरन्स घटली होती. त्या कॉन्फरसला १६० देशातून
वृत्तपत्र सृष्टीतील १८०० प्रतिनिधी उपस्थित होते. यावरून त्यांना जगात मान्यता होती हे लक्षात येते. त्यांचा अभ्यास, अनुभव व मिळालेली मान्यता ही फार महत्वाची बाब आहे असेही त्यांनी नमूद केले.
आबा बागुल यांनी अभिनव कल्पनांचा बिगुल वाजवला आहे असे कौतुक करून त्या म्हणाल्या महर्षी पुरस्कार हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे.
सत्काराला उत्तर देताना पवार म्हणाले, आबा बागुल हे कुठल्या पक्षाचे आहेत याकडे न बघता त्यांची क्रियाशीलता व ते करीत असलेले निस्पृह व कल्पक काम यामुळे मी या पुरस्कारचा स्वीकार केला. आबा बागुल हे त्यांच्या कामातून इतरांना प्रेरणा देतात. मी ज्यावेळी वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूज पेपर या संस्थेचा अध्यक्ष होतो त्यावेळी प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या. त्या
कॉन्फरसला आल्याच परंतु त्यांचे त्यावेळी मार्गदर्शनही मिळाले त्यामुळे त्या कॉन्फरन्सचे जगभर कौतुक झाले. एखादी व्यक्ती एखादी संस्था सुरु करते. मात्र त्याच्या यशामध्ये त्या संस्थेच्या विश्वस्तांचा, कार्यकर्त्यांचा , कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. त्यामुळे त्याचे श्रेय हे सर्वांचे असते.
त्यामुळे माझा हा आजचा पुरस्कार मी माझे सहकारी, देणगीदार आणि कर्मचाऱ्यांना अर्पित करतो असे ते म्हणाले.
उल्हास पवार म्हणाले, महर्षी पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रात तपस्वी नीतीने व निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. क्षेत्र मग ते राजकारणाचे असो, सामाजिक असो अथवा इतर असो त्याठिकाणी अशी माणसे ही नेतृत्व करून मार्गदर्काची भूमिका करत असतात. त्यांचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. शेती, शिक्षण, समाजसेवा, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात व
वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक उपक्रम प्रतापराव पवार यांनी राबविले आहेत. शब्दाला अर्थ आणि शब्दाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे असे गौरोद्गार त्यांनी काढले.
आबा बागुल म्हणाले, पुणे नवरात्रौ महोत्सवाला एक तप पूर्ण झाले. त्यानंतर आम्ही अशा प्रकारचा पुरस्कार देण्याचा विचार केला. पहिला पुरस्कार पं. भीमसेन जोशी यांना दिला त्यानंतर अनेक दिग्गज व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या प्रसंगी सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते सौ. प्रतिभाताई पाटील व सौ. भारटी पवार यांचा उटी भरून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप शाकंभरी किर्तीकर यांनी गायलेल्या पासायदानाणे झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर आभार घन:श्याम सावंत यांनी मानले. या कार्यक्रमानंतर प्रतापरावपवार यांची सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली.

