पुणे- भूतकाळातील जुन्या आठवणी, गाण्यांची निर्मिती, त्यांना लावलेल्या चाली आणि प्रत्यक्ष गाणे साकार होतानाचे अनुभव हे सांगत त्याच गाण्यांची बरसात करत जेष्ठ संगीतकार पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांना तृप्त केले. त्यांच्या या संगीतमय मुलाखतीने पुणे नवरात्रौ महोत्सवात रंग भरले.
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शुक्रवारी संध्याकाळी जेष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यातच ते याच महिन्यात ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्ताने त्यांची यावेळी प्रकट मुलाखत घेण्यात आळी. त्यावेळी त्यांनी केवळ त्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता. भूतकाळातील आठवनींना उजाळा देत त्यांनी केलेल्या गाण्यांनी रसिकांची संध्याकाळ रम्य केली.
रसिकांनीही त्याला दाद देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपले बालपण पुण्यातच गेले. दीदी १२ वर्षांची असताना बाबा (दीनानाथ मंगेशकर) गेले. त्यावेळी माझ्या एका पायाला ‘बोन टीबी’ झाला होता. त्यामुळे पायाचे दुखणे असल्याने मी घरात असायचो त्यावेळी बाबांचे ‘वितरी प्रखर तेजोबल, करीन समर’, हे गाणे कानावर पडायचे. त्यावरून मी वडिलांची जी बंदिश होती त्यावर आधारित ‘मी गगन सदन तेजोमय’ हे गाणे केल्याचे त्यांनी सांगितले. १९५५ साली १७ वर्षांचा असताना आकाशवाणीत काम मिळाले. मला एक गीत देण्यात आले पण मी म्हटले मला कविता द्या. त्यावेळी दीदीने मला भा. रा. तांबे यांचे पुस्तक दिले त्यावरून‘कशी काळ रागिणी, सखे ग वैरीण झाली नदी’, ‘चांदणे शिंपित जाशी.. आणि ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला’ ही गाणी केली आणि पुढे हे गाणी खूप गाजली अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
एक धुळीचा कण हा आपल्या जागी सूर्य असतो त्याप्रमाणे प्रत्येक गाणं हे एक बंदीश असतं. प्रत्येक गाण्याला आधार लागतो तो बंदिशीचा आधार त्याला असतो. माझ्या प्रत्येक गाण्याची चाल हे गुरुजनांची बंदिश ऐकत,त्यांचा व रसिकांचा सल्ला घेत केली आहे असे सांगत त्यामुळेच आजपर्यंत ९० टक्के चाली टिकल्या आहे असे ते म्हणाले.
‘मोगरा फुलला.. या गाण्याविषयीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ज्यावेळी दिदींनी हे गाणे सुरुवातीला गायले त्यावेळी त्या म्हणाल्या मला मी गायलेले हे गाणे आवडले नाही. मी गाण्याला न्याय देऊशकले नाही. त्या म्हणाल्या हे गाणे गातान मला एकही वाद्य किंवा माणूस नको आहे आणि त्यानंतर केवळ तंबोऱ्याची साथ घेत त्यांनी हे गाणे गायले. त्या गाण्याच असर महाराष्ट्रात अजून आहे.
मला संत काव्याचा लहानपणापासून नाद होता. मला अपंगत्व आले मात्र या अपंगत्वाने माझ्यावर उपकारच केले आहेत असे सांगून ते म्हणाले, वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत मला चालता येत नव्हते. मला कोणाला तरी उचलून घ्यावे लागत असे. मात्र, त्यामुळे मी घरी असल्याने वडिलांच्या गाण्याचे व पुस्तकांचे संस्कार माझ्यावर झाले. संत मीराबाईंची भक्ती किती उत्कट आहे हे त्यातून समजले. व त्यातून ‘पपीहारे पियु की वाणी ना बोल’ या गाण्याची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले.
एकदा रस्त्यांना जाताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुस्तक विक्रेत्याकडे सुरेश भटांचे पुस्तक मिळाले. त्यावेळी त्यांची व माझी ओळख नव्हती. त्या पुस्तकातील ‘मेंदीच्या पानावर, मन अजून झुलतंय गं’.. ही कविता मला आवडली आणि त्याला मी चाल लावली व गाणे ध्वनीमुद्रित केले. कविता निवडताना थोडासा अभ्यास केला पाहिजे असे सांगून ते म्हणाले हे प्रेम गीत नाही तर आईने आपल्या मुलीसाठी गायलेले गाणे आहे. १९६६ साली मी कोळी गीते करण्याचा प्रयोग केला आणि त्यातून ‘मी डोलकर डोलकर ..या गाण्याची निर्मिते झाली व या गाण्याने पुढे क्रांती केली . नारळी पौर्णिमेला समुद्रावर गेलो असताना जोराचा वर सुटला होता त्यावरून गाणे तयार केले व त्याला चाल दिली. ते गाणे शांता शेळके यांना ऐकवल. त्यांच्याच शब्दातील ते गाणं म्हणजे ‘वादळ वारं सुटलो ग…अशा आठवणीही त्यांनी सांगितल्या. या प्रत्येक गाण्याच्या निर्मितीचा इतिहास आठवणी सांगितल्यानंतर या गाण्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. राधा मंगेशकर, विभावरी आपटे- जोशी, डॉ. देविका दामले यांनी व स्वत: हृदयनाथ मंगेशकर यांनी ही गाणी गायली व रसिकांना तृप्त केले. त्यांना विवेक परांजपे, केदार परांजपे, अपूर्व द्रवीड व राजेश दूरकर यांनी साथ दिली.
कार्य्कारामचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ या गाण्याने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व श्रीलक्ष्मी मातेची प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, माजी आमदार मोहन जोशी,माजी नगरसेवक आनंद छाजेड, या कार्यक्रमाचे प्रायोजक विजय बोंद्रे व सौ. बोंद्रे, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक, माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, पं. हृदयनाथ यांचा माझ्या हस्ते सत्कार होतो हा खरतर माझा सन्मान मी समजतो. सूर आणि राजकारण हे दोन टोके आहेत. तरी माझ्या सारख्या बेसूर व्यक्तीच्या हाताने सूर असलेल्या व्यक्तीचा सत्कार होणे हे मी माझे भाग्य समजतो. मी कानसेन नाही पण माझ्या कानावर पडली त्यातून अनेक गाणी आवडीची झाली. मंगेशकर नाव कोणाला माहिती नाही असे कोणीही नाही. देशात संगीताचे अनेक घराणे आहेत मात्र, घराघरात संगीत पोहचवण्याचे काम मंगेशकर कुटुंबाने केले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या आवडीच्या हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांचा उल्लेख केला. सर्वांच्या हृदयात सुरांची आस ठेवण्याचे महान कार्य हृदयनाथ मंगेशकर यांनी केले असे गौरोद्गारही त्यांनी काढले.
आबा बागुल म्हणाले, लहानपणी हृदयनाथ मंगेशकर यांचे छडी लागे छम चं हे बालगीत अजुनही आठवते. ते कोणीही विसरू शकत नाही. लता मंगेशकर व संपूर्ण मंगेशकर कुटुंबाचा आपल्याला आशीर्वाद लाभला आहे.
हृदयनाथ मंगेशकर यांचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना मंगेशकर म्हणाले, माझे डोके भाग्यवान आहे. अनेक दिग्गजांनी या डोक्यावर पगड्या घातल्या आहेत. परंतु आजची पगडी ही सर्वार्थाने चांगली आहे. कारण विखे पाटील यांनी अभ्यासपूर्वक अत्यंत प्रेमाने व आदरपूर्वक शब्द उच्चारले. सहसा असे घडत नाही.
दीदींना गरुडाचे पंख
‘मोगरा फुलला या गाण्याच्या आठवणी सांगताना हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, दीदीला हे सुरुवातीला गाणे गायलेले आवडले नाही म्हणून तिने सर्वांना बाहेर करून केवळ तंबोऱ्याची साथ घेवून हे गाणे गायले आहे.तीला त्यावेळी एकांत हवा होतां. ती त्या गाण्याच्या पूर्ण अर्थामध्ये व चालीमध्ये तल्लीन झाली होती. त्यातून या सुंदर काव्याची निर्मिती झाली आहे. लता मंगेशकर ही अशी व्यक्ती आहे ती परत होणे नाही. देव हे असे एकदाच करतो असे ते म्हणाले. पैशाने श्रीमंत असणारी माणसे आपली संपत्ती मुलांना वाटू शकतात मात्र गायक त्याच्या मुलांना काव्य प्रतिभा देऊ शकत नाही, ते उपजतच असाव लागतं या कवी ग्रेस यांच्या वाक्याचा संदर्भ देत पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सोडून इतरांना सर्वांना चिमणीचे पंख आहेत. दीदीला मात्र गरुडाचे पंख आहेत. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी पं. हृदयनाथ मंगेशकर यांची मुलाखत घेतली. आभार घन:श्याम सावंत यांनी मानले.

