पुणे- प्रेम, दु:ख, भाव भावनांचा खेळ, संपत चाललेली माणुसकी आणि जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या रचनांवर व शायरीवरआधारित ‘एक जखम सुगंधी’ या मराठी व उर्दू गझल कार्यक्रमाला टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी भरभरून दाद दिलीआणि त्यांना अंतर्मुखही केले.
पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सोमवारी प्रसिध्द गझल गायक भीमराव पांचाळे यांचा‘एक जखम सुगंधी’ हा मराठी गझलांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पांचाळे यांनी त्यांच्या सुमधुर गझल गायकीने आणि त्यांना त्यांच्या वादक सहकाऱ्यांनी दिलेल्या साथीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली,भेटलेली माणसे गेली कुठे ….
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा ….
ही रचना आणि
अश्रूंना पंख जरासे पंख लावून घेता आले असते
या डोळ्यातून त्या डोळ्यांना झटकन देता आले असते
या हृदयाच्या जखमा त्या हृदयाला कळल्या असत्या
माणुसकीला सहजच उंचीवरती नेता आले असते …
तसेच
जळणाऱ्याला विस्तव कळतो,बघणाऱ्याला नाही
जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही
अशा एकापेक्षा एक सरस गझलांनी रसिकांना अंतर्मुखही केले.
गझल गायक पांचाळे यांना गिरीश पथक( तबला), अब्रार अहमद( संतूर), एजाजखान( व्हायोलीन) यांनी साथ दिली.
जगदीश मिस्त्री यांनी सुत्रसंचालन केले व रवी वाडकर यांनी संवादकाची भूमिका पार पाडली.पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर,नगरसेवक आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घन:श्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे,अमित बागुल, रमेश भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.

