पुणे : समस्त नाट्य वर्तुळाचे लक्ष लागलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या नटराज पॅनेलने विजयावर आपली एकहाती मोहोर उमटवली. पॅनेलचे सर्व 19 उमेदवार निवडून आले. रंगधर्मी , नटराज आणि लोकमान्य अशी तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती, परंतु खरी लढत डॉ. सतीश देसाई ,शुभांगी दामले ,निकिता मोघे,मोहन कुलकर्णी,नंदकुमार काकिर्डे यांच्या रंगधर्मी आणि नटराज या पॅनेल मध्ये होईल असे दिसत होते . मात्र नटराज पॅनेलने बाजी मारली.रंगधर्मी पॅनेलच्या दिग्गजांना हार पत्करावी लागली.मेघराज भोसले, विद्यमान अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, प्रकाश पायगुडे, जयमाला इनामदार, रजनी भट, वृषाली कुलकर्णी असे नटराज पॅनेलचे सर्वच 19 उमेदवार निवडून आले. जयमाला इनामदार यांना अधिक मते पडली.
टिळक स्मारक मंदिर येथे रविवारी बारापर्यंत मतमोजणी सुरू होती. पुणे शाखेच्या 19 जागांसाठी 53 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. सकाळी ते दुपारी चारपर्यंत एकूण 811 इतके मतदान झाले. त्यानंतर मतमोजणीस सुरूवात झाली. मतमोजणीसाठी दहा टेबल मांडण्यात आली होती. तरीही निकाल लागण्यास रात्रीचे साडे बारा वाजून गेले. माजी अध्यक्ष सतीश देसाई यांच्या रंगधर्मी आणि प्रदीपकुमार कांबळे यांच्या ‘ लोकमान्य’ पॅनेलला हार पत्करावी लागली.

