पुणे :
पुण्याच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’च्या कार्यक्रमांना दि. ६ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून, यावर्षी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. दिग्विजयसिंग, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राहुल बजाज ,उद्योगपती, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, पालकमंत्री (पुणे जिल्हा) गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ सप्टेंबर रोजी उदघाटन सोहळा होणार आहे.
यावेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मूकारी अलगुडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. के. एच. गोविंदाराज (व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संजय खान, शेखर सुमन, सुरज पांचोली, नेहा पेंडसे, मल्लिका शेरावत, पुजा हेगडे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती ‘पुणे फेस्टिव्हल’चे संस्थापक,अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, डॉ. सतीश देसाई, सुभाष सणस, पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार, मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे, श्रीरंग गोडबोले, सुप्रिया ताम्हाणे, दीपाली पांढरे, प्रसन्न गोखले, अनुराधा भारती इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ‘फेस्टिव्हल्स’ची जननी मानल्या जाणार्या या ‘पुणे फेस्टिव्हल’ चे हे २८ वे वर्ष आहे. दि . ५ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार्या ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये अनेक रंगारंग,वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे.
‘ पुणे फेस्टिव्हल कमिटी ‘, पुणेकर नागरिक , भारत सरकारचा पर्यटन विभाग , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,यांच्या सहकार्याने ‘पुणे फेस्टिवल २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘पुणे फेस्टिव्हल’च्या ‘श्री गणेशाची प्रतिष्ठापना’ नेहरू स्टेडियमच्या ‘सारस हॉल’मध्ये ५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. यावेळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अनुजा साठे उपस्थित राहणार आहेत.
६ सप्टेंबरपासून फेस्टिव्हलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ होत असून, फेस्टिव्हलचा उदघाटन सोहळा ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता गणेश कला क्रीडा केंद्र येथे होणार आहे.
यावर्षीचा ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांना या सोहळ्यात देण्यात येणार आहे .
उदघाटन सोहळ्यात तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन, अरुंधती पटवर्धन, तेजस्विनी साठे, प्रचिती डांगे ‘कथक, भरतनाट्यम् आणि ओडिसी’ नृत्य यांचा संगम असलेली गणेश वंदना सादर करणार आहेत. लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे’ या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षनिमित्त गौरव गीत सादर केले जाणार आहे. ‘कलरफुल लावणी’ या कार्यक्रमाची संकल्पना व नृ कात्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे असून यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर, भार्गवी चिरमुले,अनुजा साठे, तेजस्विनी लोणारी,गिरीजा जोशी, सुशांत शेलार यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या उत्सवांवरील ‘ फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र ‘ कार्यक्रमाची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन संतोष संखद यांचे असून अनिकेत विश्वासराव, अभिजित केळकर ,स्मिता शेवाळे, तितिक्षा तावडे यांचा यामध्ये समावेश आहे.
उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश देशपांडे ,देविका नाडिग करणार आहेत .
‘उत्सव एक -अविष्कार अनेक’ असे बोधवाक्य असलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’ मध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शन, नृत्य, गायन, ‘गणेश शरणम्’ कर्नाटकी शास्त्रीय संगीत नंदिनी राव -गुजर आणि सहकारी सादर करणार आहेत अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
‘ऑल इंडिया उर्दू मुशायरा’, धनंजय दैठणकर -रामदास पळसुले -राजेंद्र कुलकर्णी यांची तबला-संतुर- बासरी यांची जुगलबंदी, अरुण काकतकर यांचा ‘नक्षत्रांचे दिवस’ हा कार्यक्रम, डॉ. गिरीश ओक -हेमांगी कवी यांची भूमिका असलेले ‘ती फुलराणी’ हे नाटक, ‘मराठी कवी संमेलन’या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास फुटाणे करणार आहेत, ‘मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा’, एकपात्री कलाकारांचा ‘हास्योत्सव’, हिंदी सिनेमातील कपूर घराण्याच्या कार्य कर्तृत्वाचा वेध घेणारा ‘कपूर्स डायरी’ कार्यक्रम, गजाननराव वाटवे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त ‘गगनी उगवला सायंतारा’ या भावगीत गायनाचा कार्यक्रम, कर्नाटकी शास्त्रीय संगीत, ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’ ही गायन स्पर्धा, ‘शिव -ओम ‘कथक बॅले यास्मिन सिंग ,रायपूर आणि सहकारी सादर करणार आहेत , ओडिसी नृत्य, मंगळागौर स्पर्धा, जुन्या -नव्या हिंदी गाण्यांचा ‘बॉलिवूड हंगामा’,लावणी महोत्सव, महिला कलाकारांच्या पेंटिंग स्पर्धा आणि प्रदर्शन, ‘उगवते तारे’, ‘इंद्रधनू’, ‘केरळोत्सवम’असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
शिवाय ‘कुस्ती’ स्पर्धा, ‘गोल्फ’, ‘रोल बॉल’ स्पर्धा, ‘चित्रकला’ स्पर्धा , ‘मेंदी -उखाणे -पाककला’ स्पर्धा असलेला ‘महिला महोत्सव’ अशी या वेळच्या ‘पुणे फेस्टिव्हल’ची वैशिष्ट्ये आहेत. मराठीच्या भाषा भगिनी असलेल्या मल्याळी, केरळी, कर्नाटकी, भाषेतील कार्यक्रमांचाही ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये समावेश आहे. ‘झी मराठी’चा ‘गणा धाव रे ‘ , ‘झी टॉकीज’चा याड लागलाय , ‘झी क्लासिक’ या वाहिन्यांचे कार्यक्रमही या वर्षीचे वैशिष्ट्य आहे. हे कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होतील.
‘पुणे फेस्टिवल २०१६’चे मुख्य प्रायोजक झी मराठी’,झी टॉकीज,झी क्लासिक हे आहेत. सहप्रायोजक नेक्सा , जमनालाल बजाज फौंडेशन आहेत, तर असोसिएट प्रायोजक ऍडव्हीक हाय टेक प्रायव्हेट लिमिटेड , भारत फोर्ज , येस बँक ,पंचशील, नॅशनल एग को -ऑर्डिनेशन कमिटी आहेत.

