पुणे-तिसाव्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन १४ सप्टेंबर रोजी होत असून त्याची संपूर्ण रंगीत तालीम आज श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हल चे अध्यक्ष सुरेश कलमाडी,मुख्य संयाजक कृष्णकांत कुदळे,पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,सर्व कमिट्यांचे प्रमुख व सुमारे ५०० कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी आसनव्यवस्था,पार्किंग,व्ही आय पी व परदेशी पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था ,सुरक्षा आदींची रंगीत तालीम घेण्यात आली.याप्रसंगी उद्घाटन सोहोळ्यात सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रंगीत तालीम घेण्यात आली.पुणे फेस्टिव्हलच्या या रंगीत तालमीचा प्रारंभ प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाट्यम् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन सहकलावंतांसमवेत गणेशवंदनेनेझाला.. यानंतर महाराष्ट्र मंडळाची 15 मुले व मुली यांनी आकर्षक योगा प्रात्यक्षिके सादर केली. स्त्री शक्तीचा जागर असणाऱ्या 18 महिला कलावंतांनी सादर केलेले ’पोवाडा फ्युजन’ला मोठा प्रतिसाद मिळाला.. राजनीश कलावंत यांची संकल्पना, संहिता व संगीत असणार्या पोवाडा फ्युजनचे नृत्यदिग्दर्शन कोरिओग्राफर तेजश्री अडिगे यांनी केले आहे. ‘फेस्टिवल्स ऑफ इंडिया‘ हा होळी नृत्य, पंजाबी भांगडा नृत्य, गुजराती गरबा नृत्य, महाराष्ट्राचे कोळी नृत्य व नारळी पौर्णिमा यांचा समावेश असलेला नृत्याविष्कार गाण्यांसह सादर झाला. प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण, नृत्यदिग्दर्शक कुणाल फडके व शिल्पा जोशी यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले असून त्यांच्या ’डान्स मंत्रा ग्रुप’च्या 11 मुले व 11 मुली आणि ऋजुता सोमण कल्चरल अॅकॅडमीच्या 7 मुलींनी याचे सादरीकरण केले. यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र, नौशाद व जयदेव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ’ट्रीब्यूट टू बॉलीवूड म्युझिक लिजंडस्’ हा विशेष नृत्य व संगीताचा कार्यक्रम सादर झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतून योगेश देशपांडे व इंग्रजी मधून दूरिया शिप चांडलर यांनी केले.
पुणे फेस्टिव्हलसाठी रंगीत तालामींचा धडाका
Date: