३१ व्या पुणे फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन संपन्न
पुणे-गेल्या ३० वर्षांपासून अखंडित सुरु असलेल्या पुणे फेस्टिवलने पुण्याचे सांस्कृतिक जीवन समृध्द केले व कालावातांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे अशा शब्दांत जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे फेस्टिवलचा गौरव केला. केवळ पुणे फेस्टिवलच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात पुण्याला जागतिक नकाशावर नेण्याचे काम सुरेश कलमाडी यांनी केले आहे असे गौरोद्गारही त्यांनी काढले
कला, संस्कृती, गायन,वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. फेस्टीवलचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, माजी खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, दिल्लीतील ललित कला अकॅडमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे, मराठी अभिनेते प्रशांत दामले, सुबोध भावे, अमेय वाघ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी, महिला उद्योजिका उषा काकडे व बॉडी बिल्डर संग्राम चौघुले, फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सुभाष सणस हे या प्रसंगी उपस्थित होते

विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणार्या व्यक्तींना उद्घाटन सोहळ्यात‘जीवनगौरव पुरस्कार’ व’पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड’देऊन गौरवले जाते. यंदा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सुबोध भावे, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी, महिला उद्योजिका उषा काकडे व बॉडी बिल्डर संग्राम चौघुले यांना पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड देवून गौरविण्यात आले.महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून पुणे फेस्टिव्हलतर्फे २ लाख रुपयांचा धनादेश पुणे फेस्टिवलचे अध्यक सुरेश कलमाडी यांनी मुख्यमंत्री सहाय्यनिधीस जयकुमार रावळ यांच्याकडे सुपूर्द केला. सार्वजनिक गणेशोत्सवात शताब्दी साजरी करणाऱ्या गणेश मंडळांच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात येतो. या वर्षी कस्तुरी चौक मित्र मंडळ आणि निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळ या शताब्दी साजरी करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांचा उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
पवार म्हणाले, पाहिल्या दिवसापासून पुणेकरांनी पुणे फेस्टिवलचे स्वागत केले आहे. सुरेश कलमाडींनी हा सोहळा हातात घेतला आणि स्व. कृष्कांत कुदळे यांनी त्याचा नेटकेपणा जपला. म्हणून पुण्याचे नाव देशात आणि देशाबाहेर गेले. जगातील अशा प्रकारच्या फेस्टिवलमध्ये पुण्याचे नाव या फेस्टिवलमुले यायला लागले. या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना त्यांच्या कलेचे दर्शन दाखवण्याची संधी मिळाली तशीच पुणेकरांना विविध कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
शेवटच्या सिने रसिकांपर्यंत रुजलेले नाव म्हणजे प्रेम चोप्रा आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक भूमिका निभावल्या त्यांच्या अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. असे गुरोद्गार त्यांनी काढले. देशाच्या उभारणीमध्ये बजाज कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. देशात व अराज्यात अनेक उद्योजक आहेत परंतु आपल्या कंपनीजवळ कामगारांबरोबर राहणारे राहुल बाजाज हे एकमेव उद्योजक आहेत असे गौरोद्गार त्यांनी काढले. स्व. कृष्णकांत कुदळे यांच्या गेल्याचे मनस्वी दू:ख आहे.आपल्याला नवीन पिढीतील कृष्णकांत कुदळे तयार करावे लागतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जयकुमार रावळ म्हणाले, कला, क्रीडा, संस्कृती सदर करण्याचे पुणे फेस्टिवल हे एक मोठे व्यासपीठ आहे. याच मंचावरून अनेकांनी पुढे देशात व जगात व्यासपीठ गाजवले. हा फेस्टिवल आता थांबवता येणार नाही. या फेस्टिवलचा आलेख हा चढता ठेवावा लागेल. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले.
छगन भुजबळ म्हणाले, पुणे फेस्टिवल हा पुण्यापुरता मर्यादित न राहता तो जगाचा फेस्टिवल झाला. त्याच्यामागे सुरेश कलमाडींची शक्ती तर आहेच परंतु स्व. कृष्णकांत कुदळे यांची मेहनतही होती. मंदीच्या काला सुद्धा पुणे फेस्टिवलमध्ये होणारे भव्यदिव्य कार्यक्रम यशस्वी होताहेत याबद्दल पुणेकरांचे अभिनंदन असे उद्गार त्यांनी काढले. कलमाडींना अनेक अडचणी आल्या मात्र ‘ शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे त्यांनी हे कार्य ३१ वर्षे सुरु ठेवले. बॉलीवूडच्या कलाकारांना पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर कलमाडी यांनी आणले असे ते म्हणाले. प्रेम चोप्रा यांची नकारात्मक भूमिका होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात राग असायचा मात्र तीच त्यांच्या कलेची पावती आहे असे ते म्हणाले.
सुरेश कलमाडी म्हणाले, एखादा महोत्सव सुरु करणे सोपे असते मात्र तो सुरु ठेवणे अवघड असते. पुणे फेस्टिवलच्या ३१ वर्षाच्या प्रवासात अनेकांचे योगदान आहे. जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी २७ वर्षे गणेश वंदना आणि बले सदर केली. पुणे फेस्टिवलची “मदर ऑफ ऑल फेस्टिवल’ अशी झाली आहे. स्व. कृष्णकांत कुदळे यांचेही त्यासाठी मोठे योगदान होते असे ते म्हणाले.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, राहुल बजाज यांनी हजारो लोकांना रोजगार व काम दिले आहे. प्रेम चोप्रा यांनी अनेक कुटुंबे उध्वस्त केली परतू ती पडद्यापुरतीच होती. प्रत्यक्ष जीवनात हा माणूस खूप शांत आणि प्रेमळ आहे असे गौरोद्गार त्यांनी काढले. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील खरे चाणक्य किंवा भारतरत्न आहेत. त्यांनी महाराष्ट्राला व देशाला दिशा दिली. त्यामुळे त्यांची देशाला गरज असून त्यांनी मार्गदर्शक मंडळात जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या प्रसिध्द असलेल्या ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ या संवादाने आपल्या भाषणास सुरुवात केली. त्याला प्रेक्षकांनी शिट्या व टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. आपल्याला आज खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे असे सांगत ज्यांची उमेद हरवली आहे त्यांच्यासाठी पुणे फेस्टिवलसारख्या फेस्टिवल आवश्यक असतो असे ते म्हणाले.
राहुल बजाज यांनी पुण्याला मी भारताचे महत्वाचे शहर मानत असे सांगितले. पुणे फेस्टिवलचा सुरेश कलमाडी यांच्यामुळे अनेकदा संबंध आला आहे. आजच्या गौरवाने मनस्वी आनंद झाला आहे असे ते म्हणाले.
प्रशांत दामले, सुबोध भावे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.यानंतर‘पंचजन्य शंखनाद’प थकातर्फे २० युवक युवतींनी सलवार, झब्बा,उपरणे व पुणेरी पगडी अशा पेहेरावात सादर केलेल्या सामुहिक शंखध्वनी कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. संतोष पोतदार यांनी याचे आयोजन केले होते. यानंतर नंदिनी गुजर यांनी गणेश स्तुती सादर केली. कथ्थक नृत्यांगना तेजस्विनी साठे व भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी १२ सहकलावंतांसमवेत एकत्रित ‘गणेश पंचरत्नं -मुदा करत मोदकं’ या संस्कृत श्लोकावर आधारित कथ्थक व भरतनाट्यम यांचे फ्युजन असणारी नेत्रदीपक गणेश वंदना सादर केली.अमोद कुलकर्णी यांनी याचे संगीत संयोजन केले आहे.यानंतर श्री गणेशाची पूजा व आराधना करणार्या ‘जय देव जय देव श्री गणराया’, ‘लंबोदर तू विनायका’, ‘सुख करता दुःख हरता’, ‘सांगतो नमन’ आणि ‘हरे राम हरे राम’ महामंत्र यावर आधारित बॉलीवूड गणेश पूजा या सिद्धी पोतदार आणि अक्षय गुप्ता यांनी ‘सिधाक्ष प्रॉडक्शन’ तर्फे सादर केलेल्या विशेष नृत्याविष्कार सादर केला. यामध्ये १८ मुले मुली सहकलावंत सहभागी झाले होते. सिद्धी पोतदार यांनी नृत्यदिग्दर्शन केले . यानंतर गुरु पंडिता मनीषा साठे यांनी संरचना केलेला जपानी डान्सिकल टायको‘कलासंयुज’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. . टायको हे पारंपारिक जपानी वाद्य ११ भारतीय शिष्यांनी कथ्थक नृत्य प्रणालीसह सादर केले. पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासून सलग 30 वर्षे पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक म्हणून काम करणारे कृष्णकांत कुदळे यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारी फिल्म यावेळी दाखविण्यात आली. सुभाष सुर्वे यांनी याची निर्मिती केली आहे. केरळच्या सांस्कृतिक परंपरांवर आधारित ‘आपला केरळ’हा नृत्यसंगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये ४० स्थानिक मल्याळी मुले-मुली कलावंत पारंपारीक वेषभूषेत कथ्थकली,भरतनाट्यम्, मोहिनीअट्टम,थिरूवाथिरकली, कुचीपूडी अशी नृत्ये सादर केले.पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर यांनी याचे आयोजन केले होते.या उद्घाटन सोहळ्यात शेवटी ‘लावणी आणि घुमर’यांचे फ्युजन सादर करण्यात आले. त्यामध्ये चित्रतारका तेजा देवकर, संस्कृती बालगुडे, भार्गवी चिरमुले,मानसी मुसळे, गिरीजा प्रभू आणि वैष्णवी पाटील सहभागी झाल्या होत्या. सोबत पुणे फेस्टिव्हलचे 30-40सहकलावंत देखील सहभागी झाले होते. पायलवृंदच्या निकिता मोघे यांनी यांचे नृत्य दिग्दर्शन केले
या उद्घाटन सोहळ्याचे मराठीतून सुधीर गाडगीळ आणि इंग्रजीतून दूरिया शिपचांडलर यांनी सूत्रसंचालन केले.