पुणे : इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या कबडीपट्टू मुलीचा नात्यातील तरुणाने धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची घटना बिबवेवाडी मधील यश लॉन्स नजीक संध्याकाळी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या मुलीची हत्या होत असताना या ठिकाणी लहान मुले कबड्डीचा सराव करीत होते तसेच नागरिक चालण्याचा व्यायाम करीत होते. हा थरार पाहून सर्व जण तिथून पळाल्याचे सांगितले जातेय . ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.हत्या झालेल्या मुलीचे वय 14 आहे. तिची ओळख पटली आहे ,नाव समजले आहे ,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हि मुलगी इयत्ता 8 वी मध्ये शिकत होती. ती कबड्डी खेळाडू होती. ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी तिच्या नात्यातला एक तरुण आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्याने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्याने तिच्या मैत्रिणींना लांब पळवून लावले. सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. ती खाली पडल्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर एकामागे एक असे वार करण्यास सुरुवात केली. अत्यंत भीषण पद्धतीने आरोपीने तिचा खून केला आहे. धडापासून मुंडके वेगळे करण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यामधून दिसून येते. खून केलेला कोयता आणि अन्य शस्त्र तेथेच टाकून आरोपी पसार झाले. घटना घडण्याच्या थोडावेळ आधीच पोलिसांची गस्त घालणारी गाडी तिथून गेली होती. तरीदेखील एवढी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.दरम्यान, आरोपीकडे पिस्तुल देखील होते. ते त्याला गुन्हा करतेवेळी काढता आले नाही. ते पिस्तुल त्याने तेथेच टाकून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पुण्यात 14 वर्षीय मुलीचा कोयत्याने वार करून खून
Date:

