लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत काही नागरिकांचे डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड त्यांच्याजवळ असतानाही त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढण्यात आले होते. याबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेऊन बँका, वित्तीय संस्था यांच्याकडे पाठपुरावा करून ५८ लाख रुपये आम्ही परत मिळविले, १४१ तक्रारदारांना हे पैसे परत करण्यात आले आहेत.”
– संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा.
पुणे : शहरामध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मागील महिनाभरात १४१ नागरिकांचे डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड त्यांच्याजवळ असतानाही ऑनलाईन व्यवहार होऊन त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढण्यात आले होते. याबाबत सायबर पोलिस ठाण्याचे बँका, वित्तीय संस्था, ई वॉलेट कंपन्यांकडे पाठपुरावा करून तब्बल ५८ लाख रुपये परत मिळवून संबंधीत नागरिकांना परत केले.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे २३ मार्चपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे बहुतांश नागरीक घरून काम करत आहेत. ऑनलाईन खाद्यपदार्थ, भाजी, फळे, औषधे वगळता अन्य सर्व प्रकारचे व्यवहार सध्या ठप्प आहेत. असे असताना काही नागरिकांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा वापर करून ऑनलाईन व्यवहार केलेले नसतानाही त्यांच्या बँक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढण्यात आली.
२३ मार्चपासून आत्तापर्यंतच्या एक महिन्याच्या कालावधीत शहरातील १४१ नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे काढण्यात आले.याबाबत संबंधीत नागरिकांनी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.
आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने संबंधीत प्रकरणांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी अचानक पैसे काढून घेणाऱ्या बँका, वित्तीय संस्था, ई वॉलेट कंपन्या, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपन्या यांच्या कार्यालयांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकारची माहिती दिली.तसेच संबंधीत नागरिकांचे पैसे तत्काळ परत करण्याबाबत त्यांना सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार १४१ जणांचे तब्बल ५८ लाख रुपये सायबर पोलिसांनी परत मिळविले, तसेच तक्रारदार व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना ते पैसे परत केले.

