पुणे-अमली पदार्थाच्या तस्करी साठी कार हवी म्हणून पुण्यात येवून एका ५२ वर्षीय ओला कॅब चालकाचा मध्यरात्री नंतर खून करून कार घेवून पसार झालेल्या २५ वर्षीय राजस्थानी तरुणाला अवघ्या 12 तासात पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे .
आज या संदर्भात पुण्याचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड ,सुहास बावचे आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेतून हि माहिती दिली .
तपेशकुमार पुखराम चौधरी (रा. ३२ नई पाली रोड ,जोधपुर राजस्थान )असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेची हकीकत अशी कि ,२२ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कोन मंदिराच्या जवळ एक मृतदेह पोलिसांना आढळून आला होता .तेथील स्थितीवरून कोणीतरी अज्ञात इसमाने खून करून येथे मृतदेह टाकला आणि पसार झाला असे निदर्शनास आले .
दुपारी या मृत देहाची ओळख पटविण्यात यश आले आणि पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरली .सुनील रघुनाथ शास्त्री (वय ५२ रा. लोहगाव -ओला कॅब चालक )असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .आणि त्याच्या मुलाने २२ जून रोजी दुपारी साडेचार वाजता आपले पिता कॅब सह बेपत्ता झाल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात नोंदविली होती .त्यानंतर अवघ्या २ तासात सूत्रे वेगाने हलली आणि आरोपी अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला .
पोलिसांनी सांगितले कि , आरोपी तपेश कुमार याने शास्त्री यांची हि ओला कॅब २१ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भाड्याने हायर करून या बाजूला कॅबचालकाला आणले आणि बरोबर त्याच्या मागे बसून गळा आवळून त्याचा खून केला आणि याठिकाणी प्रेत टाकून त्याची कॅब घेवून तो पसार झाला .सीसी टीव्ही फुटेज तपासून आणि संपर्क यंत्रणा वापरून या गुन्ह्याचा तपास करण्यात आला . तेव्हा हि कॅब ओलाच्या मदतीने कुठे आहे त्याबाबतचे लोकेशन शोधण्यात आले. आणि त्यानुसार राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून २२ जून रोजीच सायंकाळी साडेसहा वाजता आरोपीस पकडण्यात आले. आणि नंतर त्यास पुण्यात आणण्यात आले. अमली पदार्थांच्या तस्करी साठी त्याने कार हवी म्हणून हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.