पुणे- शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत. पुणे पोलिसांकडे रोज ज्येष्ठ नागरिकांच्या किमान तीन ते चार तक्रारी येतात. ज्येष्ठांनी पोलिसांना मित्र मानावे. काही अडचण असल्यास पोलिसांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले.
पुणे पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष बांधण्यात आला आहे. कक्ष उभारणीसाठी पुणे पोलिसांना अथश्री फाउंडेशनकडून साहाय्य करण्यात आले आहे. या कक्षाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या प्रसंगी शुक्ला बोलत होत्या. अथश्री फाउंडेशनचे शशांक परांजपे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पी. आर. पाटील, शेषराव सूर्यवंशी, सहायक आयुक्त अरुण वालतुरे, सुरेश भोसले या प्रसंगी उपस्थित होते.शुक्ला म्हणाल्या, की ज्येष्ठ नागारिक कक्षाकडून आतापर्यंत दहा हजार ज्येष्ठांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी पाच हजार ज्येष्ठांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणीसाठी नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. पुणे शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. नातेवाइकांकडून दिला जाणारा त्रास, मालमत्तेवर डोळा ठेवणे, सांभाळण्यास नकार देणे अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या जातात. पुणे पोलिसांकडे रोज किमान तीन ते चार ज्येष्ठ नागरिक तक्रारी करतात. ज्येष्ठ नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. त्यांनी पोलिसांना मित्र मानावे. कोणतीही अडचण आल्यास तक्रार करावी.अथश्री फाउंडेशनच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुले परदेशात स्थायिक होतात. त्यामुळे ज्येष्ठांना एकटे राहावे लागते. एकाकी जगणाऱ्या ज्येष्ठांना भीती वाटते. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी पुणे पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिक कक्ष सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरू केलेले हे महत्त्वाचे काम आहे. ज्येष्ठांना ओळखपत्र देण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे शक्य होईल, असे परांजपे यांनी सांगितले.





