पुणे : यंदाच्या हिवाळ्यातील निचांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (ता. 17) सकाळी साडेआठ वाजता शिवाजीनगर येथील वेधशाळेत झाली. तेथे किमान तापमान 8.2 अंश सेल्सियस नोंदले गेले. पाषाण येथे 8.9 अंश सेल्सियसची नोंद झाली.
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीर खोऱ्यात सलग हिमवर्षा होत आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वहात आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
राज्यात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभावही मावळला आहे. त्यामुळे उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्याला अडथळा होणार नसल्याने थंडी कायम राहणार असल्याचे खात्याने स्पष्ट केले.