पुणे-दोन वर्षानंतर यंदा संपूर्ण राज्यात निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, संपूर्ण जगात वेगळीच ओळख असलेल्या पुण्यात बुधवारी अतिशय थाटामाटात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले. गणेश चतुर्थी दिनी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या गणपतीची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर मंत्री पाटील यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह अनेक प्रथितयश मान्यवर तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन घरगुती गपणतींचे दर्शन घेतले. तसेच सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिवसेना- भाजपा महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त केल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे बुधवारी संपूर्ण राज्यासह पुण्यात मोठ्या थाटात गणरायाचे आगमन झाले. ढोल -ताशाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने अतिशय भक्तीमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले.
गणेश चतुर्थी दिनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दर्शन घेऊन सर्वांना उत्तम आरोग्यासह कोविड सारखे विघ्न पुन्हा उद्भवू नये, यासाठी गणरायाला साकडे घातले. यानंतर पुण्यातील सुप्रसिद्ध भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या गणपतीच्या मिरवणुकीत रथाचे सारथ्य मंत्री पाटील यांनी करुन, विधीवत प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठापनेनंतर पुण्याच्या मानाच्या गणपतींचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दर्शन घेऊन पूजा केली. तसेच संध्याकाळी पुणेकरांचे श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने साकारलेल्या पंचकेदारेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीवरील विद्युत रोषणाईचे मंत्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याशिवाय गणेश चतुर्थीच्या मंगल दिनी पुण्यातील प्रथितयश मान्यवर आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन मंत्री पाटील यांनी घरगुती गणपतींचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यात प्रामुख्याने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षा पल्लवी गाडगीळ, कोथरूड भाजपा कार्यकर्ता अद्वैत जोशी आदींचा समावेश होता.