पुणे : डीजे, डॉल्बीला फाटा देत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – बोपोडी भागात भारतीय जनता पार्टी तर्फे विविध लोकपयोगी कार्यक्रमांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करत बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली.
कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न करता आल्याने यंदा मात्र अत्यंत उत्साहात ही जयंती साजरी करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथील सर्वसामान्य नागरिकांसाठी पीएमपीएलचे संचालक प्रकाश ढोरे, भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने तसेच भाजप शिवाजीनगर मंडल सरचिटणीस आनंद छाजेड यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत प्रकाश ढोरे म्हणाले डॉ.आंबेडकरांनी समाजातल्या सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच बाबासाहेबांची जयंती लोकोपयोगी तसेच वैचारिक कार्यक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे करत असताना समाजातील प्रत्येक घटकांसाठी उपयोगी अशा कार्यक्रमांची आम्ही आखणी केली. या भागातील नागरिकांसाठी ‘मोफत नेत्ररोग चिकित्सा व मोतीबिंदू शिबीर’ तसेच बालमित्रांसाठी बालमेळावा आयोजित केला होता. त्याचप्रमाणे आधारकार्ड मध्ये दुरुस्ती करू इच्छीणाऱ्या तसेच नवीन कार्ड काढणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी ‘आधारकार्ड शिबीर’ आयोजित केले होते. या परिसरातील काही सर्वसामान्य विवाहित जोडप्यांचा सत्कार आयोजित केला होता. लोकांना त्यांच्या दररोजच्या दिनचर्येतून थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने आम्ही त्यांचा सत्कार केला.
सुनील माने म्हणाले, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करून ‘पुणे मेट्रो प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. त्यांच्याच हस्ते लोकार्पण होऊन मेट्रो पुणेकरांच्या सेवेत सुरु करण्यात आली. औंध बोपोडी भागात ही मेट्रो येणार आहे. मात्र अजून त्यासाठी थोडा कालावधी लागेल. त्यापूर्वी पुणे मेट्रो कशी आहे, मेट्रो मध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. हे दाखवण्यासाठी आज येथील सर्वसामान्य नागरिकांसाठी पुणे मेट्रोची सफर आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंबेडकरी चळवळी मधील काही लोकांचा मेट्रो मध्ये सत्कार ही मेट्रो मध्ये करण्यात आला.
आनंद छाजेड म्हणाले ‘भिमा तुझ्या जन्मामुळे’ हे महानाट्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंग दाखवून पुन्हा एकदा बाबासाहेबांचा इतिहास लोकांपुढे मांडण्यात आला. पार्श्वगायक, लोकशाहीर नंदेश उमप यांच्या ‘नंदेश उमप रजनी’ हा कार्यक्रमातून लोकांना अनेक लोकप्रिय गीतांसोबत लोकसंगीताचा अस्वाद घेता आला. या सर्वच कार्यक्रमांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

