केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम स्थळा समोर लोकशाही मार्गाने निदर्शने
पुणे- बालगंधर्व रंग मंदिरात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आल्या असताना याच चौकात कॉंग्रेसचे रमेश बागवे आणि मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पण लोकशाही मार्गाने निदर्शने करण्यात आली . तिरडी आंदोलन प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, “ज्या पद्धतीने आमच्या महिला कार्यकर्त्यांना अटक केले आहे ते निषेधार्ह आहे. लोकांच्या भावना व प्रश्न ऐकून न घेता मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने दडपून टाकू पाहत आहे. पण जन भावना अशी दडपली जाणार नाही तर ती आणखी भडकेल तेव्हा सरकारने वेळीच शहाणे व्हावे आणि महागाई विरोधात तातडीने पावले उचलावीत “
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व कार्यकर्त्यांना पोलिसांनी केल्याच्या अटकेचा निषेध करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, “केंद्र सरकारची ही दडपशाही निषेधार्ह असून याविरोधात काँग्रेस पक्ष गल्ली ते दिल्लीपर्यंत आवाज उठवेल. यापुढे लोकांचे प्रश्न घेऊन काँग्रेस लोकांची आवाज बनून मोदी सरकारला धडा शिकवेल. मोदी सरकार जनतेचा आवाज दाबून राज्य करु पाहत आहे.”यावेळी पुणे शहर महिला काँग्रेस, पुणे शहर जिल्हा काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज सकाळी १२.०० वाजता JW मेरियट हॉटेल येथे पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी चूल व देश चालविण्यासाठी पंतप्रधान मोदी अयशस्वी असल्याने स्मृती ईराणी यांच्या मार्फत त्यांना बांगड्या भेट म्हणून देण्यासाठी गेलेल्या पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. पूजा आनंद यांच्यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले.
जवळपास ५ तास डिटेन केल्यानंतर पोलिसांकडून पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. पूजा मनिष आनंद व कार्यकर्त्यांना सोडून दिले. त्यानंतर पुणे शहर महिला काँग्रेस व पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय जोमाने सायंकाळी ४.३० वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत बालगंधर्व रंगमंदिरासमोर तिरडीवर गॅस बांधून गॅसची तिरडी यात्रा काढली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व घोषणा दिल्या. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात ‘हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी,स्मृती जी याद हैं ना?, हम सब एक है नरेंद्र मोदी फेक है अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.
यावेळी बोलतांना पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ.पूजा आनंद म्हणाल्या, “देशातील महागाईच्या विरोधात लढताना व जनतेचे प्रश्नांवर काम करतांना पोलिसांनी अशा प्रकारे ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या धोरणानुसार आम्ही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही जनतेच्या प्रश्नांवर लढत राहू. यासाठी पोलिसांनी आम्हाला शंभरवेळा जरी अटक केले तरी आम्ही तयार आहोत. लोकशाहीमार्गाने व गांधीजींच्या सत्याग्रहाद्वारे, जनतेला सोबत घेवून मोदी सरकारची हुकूमशाही आम्ही मोडून काढू.”