पुणे :औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथे दरवर्षी पावसाळयामध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी पावसाळा सुरु होण्यास अत्यंत थोडा कालावधी शिल्लक असूनही या भागातील पावसाळ्या पूर्वीची कामे अद्याप सुरु झालेली नाही. ही कामे तातडीने सुरु करावीत अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी आज औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त संदीप खलाटे यांच्याकडे केली.
सुनील माने म्हणाले, औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथील नागरिकांना पावसाळ्यात त्रास होत असल्याने माझ्याकडे नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. चिखलवाडी येथील बुद्ध विहारासमोरील तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडीयम येथील ड्रेनेज लाईनची स्वच्छता झाली नसल्याने, येथे रस्त्यावर पाणी साठण्याची शक्यता आहे. माता रमाबाई आंबेडकर शाळेच्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता नसल्याने या शाळेच्या मैदानावर पाणी साठते तेच पाणी स्थानिकांच्या घरात येते. माउंटवर्ड सोसायटी ते खडकी स्टेशन या मार्गावर सुद्धा पावसाळ्यात पाणी साठते.
त्याचप्रमाणे औंध रोड चव्हाण वस्ती येथील पाठीमागील बाजूस असलेले चेंबर्स मध्ये गाळ साचल्याने तेथे ड्रेनेजचे पाणी साठून राहते. पावसाळ्यापूर्वी या ड्रेनेजमधील गाळ काढणे आवश्यक आहे, बोपोडी येथील लहूजी वस्ताद साळवे नगर तसेच बोपोडी सर्वे नंबर २४ येथील चेंबरचे पाणी नागरिकांच्या घरात जाते, बोपोडी येथील हॅरीस ब्रिजच्या खाली ही प्रतिवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठून रहदारीला अडथळा निर्माण होतो. ही कामे लवकरात लवकर करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रभागातील सर्व गोल चेंबर्स तसेच मेन लाईनचा गाळ पावसाळ्याच्या आधी काढणे ही गरजेचे आहे. आपण वैयक्तिक लक्ष घालून पावसाळयापूर्वी ही कामे करून या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती खलाटे यांच्याकडे सुनील माने यांनी केली.

