पुणे- राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर काँग्रेस भवन ते महात्मा गांधी पुतळा, पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत दुचाकी वरून ‘‘प्रभात फेरी’’ काढण्यात आली. पुणे स्टेशन येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास शहराध्यक्ष रमेश बागवे व स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची ७४ वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या अहिंसा आणि सत्याग्रही मार्गामुळेच ब्रिटिश सरकारला भारत सोडून जावे लागले. गांधींजींनी दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून आपल्या आंदोलनाला सुरूवात केली होती. भारतात परतल्यावर त्यांचे गुरू गोपाळकृष्ण गोखले यांच्या प्रेरणेने त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरोधात अनेक आंदोलने केली. असहकार चळवळ, दांडीयात्रा, बारडोली सत्याग्रह, चंपारण्य सत्याग्रह, सविनय भंग चळवळ व ‘छोडो भारत’ आंदोलन अशा विविध प्रकारची आंदोलने केली. पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, खान अब्दुल गफार खान, सरोजनी नायडू आदी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांनी स्वातंत्र्यांला चळवळ एक वेगळी दिशा दिली. समाजातील सर्व घटकांना एकत्र करून शांतीचा व पुरोगामी विचाराचा संदेश जगाला दिला. त्यांच्या विचारांना प्रेरित होवून मार्टिन ल्युथर किंगने अमेरिकेत व नेल्सन मंडेलाने द. आफ्रिकेमध्ये वर्णभेदाच्या विरोधात आंदोलन छेडले. आज १८० देशात महात्मा गांधींचे पुतळे आहेत. आज देशात नथुराम गोडसेच्या विचारसरणीची काही मंडळी देशामध्ये जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. या विचारसरणीच्या लोकांचा योग्यवेळी बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा देशात अनर्थ घडेल. आजच्या पिढीने गांधीजींचा अहिंसेचा मार्ग व विचार घेवून पुढे चालले पाहिजे त्यामुळेच देशाची आणि जगाची प्रगती होईल. या महाननेत्यांला मी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.’’
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक अरविंद शिंदे, माजी आमदार दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी यांचीही भाषणे झाली.
यावेळी उपाध्यक्ष शिवाजी केदारी, हाजी नदाफ, महिला अध्यक्षा पुजा आनंद, युवक अध्यक्ष विशाल मलके, नगरसेविका लता राजगुरू, अविनाश बागवे, अजित दरेकर, रमेश अय्यर, नुरूद्दीन सोमजी, वाल्मिक जगताप, द. स. पोळेकर, अरुण वाघमारे, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रविण करपे, रमेश सकट, अजित जाधव, रजनी त्रिभुवन, मुन्नाभाई शेख, अविनाश अडसुळ, किरण मात्रे, मेहबुब नदाफ, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्हिड, विनोद रणपिसे, अनुसया गायकवाड, सुंदरा ओव्हाळ, विजय वारभुवन, ज्योती परदेशी, सुविधा त्रिभुवन, गणेश शेडगे, राहुल तायडे, लतेंद्र भिंगारे, विठ्ठल गायकवाड, कन्हैय्या मिनेकर, राजू शेख, सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.

