पुणे – खाजगी बसगाड्यांसाठी संगमवाडी बीआरटी मार्गावर वाहतुकीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अलीकडे संगमवाडी मार्गावरील वाहतूक वाढलेली आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळात वाहनांच्या संख्येत भर पडून वाहतुकीची कोंडी होते. याकरिता बीआरटी मार्गावर खाजगी बसगाड्यांना वाहतुकीची परवानगी द्यावी त्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल. या मार्गावर अद्यापपर्यंत तरी पूर्ण क्षमतेने बीआरटीची वाहतूक होत नाही. बराच वेळ हा मार्ग रिकामाच असतो. हा मार्ग पूर्णपणे वापरात येणे ही गरज बनली आहे याकरिता खाजगी बसगाड्यांना परवानगी द्यावी असे शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी संबंधित खात्यांना आपण तातडीने सूचना द्याव्यात असे पत्रात सुचविले आहे.
रांजणगांव इंडस्ट्रीअल असोसिएशनने औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या बसगाड्यांसाठी येरवडा बीआरटी मार्ग खुला करावा अशी मागणी पीएमआरडीएकडे केलेली आहे. ही मागणी मान्य करावी याकरिता दिनांक ८ फेब्रुवारी २०२० रोजी पत्र दिले होते. त्या मागणीचाही आधिक विलंब न होता विचार व्हावा असे शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

