पुणे- सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई व नुतनीकरणास प्राधान्य असल्याचे प्रतिपादन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून कोथरुड मधील स्वच्छतागृहांची साफसफाई व नुतनीकरण अभियान सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभ लक्ष्मीनगरमध्ये झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडलाचे झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, स्थानिक नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, कोथरूड मंडल सरचिटणीस गिरीश भेलके, अनुराधा एडके, दिनेश माथवड, प्रभाग क्रमांक १२ चे अध्यक्ष अमित तोरडमल यांसह भागातील नागरीक पदाधिकारी उपस्थित होते.
स्वच्छतागृहाची साफसफाई व नुतनीकरण उपक्रमाबद्दल माहिती देताना श्री. पाटील म्हणाले की, उत्तम आरोग्यासाठी स्वच्छतागृहांची साफसफाई आणि त्याची देखभाल आवश्यक आहे. माझे बालपण मुंबईतील एका चाळीत गेल्यामुळे वस्ती भागातील स्वच्छतागृहांची दुरवस्था मी पाहिलेली आहे. त्यामुळे कोथरूडमधील वस्ती भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी स्वच्छतागृहांची साफसफाई आणि नुतनीकरण उपक्रम हाती घेतला आहे.
ते पुढे म्हणाले की, वस्ती भागातील महिलांना आरोग्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून वस्ती भागातील महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅडचे मशिन, तसेच त्याचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोजल मशिन कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान,आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून कोथरूडमधील वस्ती भागातील स्वच्छतागृहांची साफसफाई आणि नुतनीकरण करण्यात येणार आहे. दर आठवड्याला स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी जेट्टी मशिन वस्ती भागात जाऊन स्वच्छतागृहांची साफसफाई करणार आहे.

