- 1 मे नंतर खासगी रुग्णालयांना थेट कंपन्यांनकडून लस खरेदी करता येणार असल्याने महापालिकेकडून त्यांना लस पुरवठा केला जाणार नाही.
पुणे – पुणे महापालिकेने १ तारखेनंतर देखील ज्येष्ठ नागरिकांचेच प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. शहरामध्ये लसीकरण मोहिमेने सुरुवातीला वेग घेतला होता. मात्र नंतर येणाऱ्या लसीची संख्या कमी झाल्याने अगदी थोड्या लोकांना लस मिळायला सुरुवात झाली होती. मागील शुक्रवार, शनिवार ,रविवारी लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद होते त्या मुळे नागरिकांना परत माघारी जावे लागले .याच पार्श्वभूमीवर आता 1 तारखेपासूूून 18 वर्षांच्या वरच्या नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे.
हे सुरु झाल्यानंतर दुसऱ्या डोसचे लसीकरण कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत आज (दि. 26) अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याविषयी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले ’28 दिवसांत जवळपास 4 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापुढे लस कमी असल्याने प्राधान्याने 1 तारखेनंतर 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरु होईल, त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सरकारच्या आदेशानंतर 1 तारखेनंतर खासगी रुग्णालयाला लस पुरवली जाणार नाही. त्यामुळे आता महापालिकेला आलेल्या सगळ्या लसी महापालिकेच्या केंद्रावर वापरली जातील’.तसेच महापौर निधी मधून १०० नवीन व्हेंटिलेटर खरेदी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

