वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात पंतप्रधान सहभागी:21,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

Date:

वडोदरा -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी झाले. त्यांनी 21,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी लाभार्थी, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय आणि राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीलाच पंतप्रधान म्हणाले की आजचा दिवस त्यांच्यासाठी मातृ वंदना (मातृपूजन) दिवस आहे. आज 100 व्या वर्षात पदार्पण केलेल्या आईचे आशीर्वाद घेऊन त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी पावागड टेकडीवरील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या  श्री कालिका मातेच्या मंदिराचे उद्घाटन केले, आणि देशासाठी प्रार्थना केली तसेच देशसेवेसाठी आणि अमृत काळात  देशाचे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी देवीकडे शक्ती मागितली. त्यानंतर त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या विशाल ‘मातृशक्तीला’ वंदन केले.

आजच्या कार्यक्रमातील 21000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, हे प्रकल्प गुजरातच्या विकासाद्वारे भारताच्या विकासाच्या संकल्पनेला बळ देतील. मातांचे  आरोग्य, गरीबांसाठी घरे, कनेक्टिव्हिटी आणि उच्च शिक्षण या क्षेत्रांतील ही मोठी गुंतवणूक गुजरातच्या औद्योगिक विकासाला चालना देईल, असे ते म्हणाले. यातील अनेक प्रकल्प महिलांचे आरोग्य, पोषण आणि सक्षमीकरणाशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महिला सक्षमीकरणाला विकासाचा आधार बनवण्याच्या दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांना कालिका मातेच्या आशीर्वादाने  नवी गती मिळाली आहे. 21व्या शतकातील भारताच्या जलद विकासासाठी महिलांचा जलद विकास, त्यांचे सक्षमीकरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज भारत महिलांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन योजना आखत आहे आणि निर्णय घेत आहे,” असे यावेळी उपस्थित अनेक परिचित चेहरे ओळखताना त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, महिलांसाठी सर्व क्षेत्रात संधी खुल्या झाल्या आहेत आणि सरकारने महिलांच्या जीवनचक्राचा  प्रत्येक टप्पा  लक्षात घेऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना आखल्या आहेत. “वडोदरा हे मातृशक्ती उत्सवासाठी योग्य शहर आहे कारण मातेप्रमाणे संस्कार देणारे हे शहर आहे. वडोदरा हे संस्कारांचे शहर आहे. हे शहर येथे येणाऱ्यांची सर्व प्रकारे काळजी घेते, त्यांच्या सुख-दु:खात साथ देते आणि पुढे जाण्याची संधी देते. या शहराने स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, विनोबा भावे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांना प्रेरणा दिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या वैयक्तिक प्रवासात या शहराने बजावलेल्या भूमिकेचेही मोदींनी स्मरण केले. ते म्हणाले की 2014 मध्ये त्यांना वडोदरा  आणि काशी विश्वनाथ या दोन्ही ठिकाणी विजय मिळाला होता. माता  आणि महिलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे याचा त्यांनी  पुनरुच्चार केला. मातेचे आरोग्य केवळ तिच्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी, विशेषतः तिच्या बाळासाठी महत्त्वाचे आहे. दोन दशकांपूर्वी जेव्हा गुजरातने मला सेवा करण्याची संधी दिली तेव्हा कुपोषण हे एक खूप मोठे आव्हान होते. तेव्हापासून आम्ही एकामागून एक या दिशेने काम करू लागलो, ज्याचे फलदायी परिणाम आज दिसत आहेत”, असे ते म्हणाले. आदिवासी भागातील सिकलसेलच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतही पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की सप्टेंबर ‘पोषण माह’-पोषण महिना म्हणून साजरा करण्याचा निर्णय गुजरातच्या महिलांना मदत करेल. पोषणाव्यतिरिक्त, स्वच्छ भारत आणि उज्ज्वला सारख्या योजनांच्या माध्यमातून  सरकारने महिलांना पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.

“गुजरातमधील महिलांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी,  निर्णय घेण्यासाठी त्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांची व्यवस्थापन क्षमता समजून घेऊन गावाशी संबंधित अनेक प्रकल्पांमध्ये भगिनींना नेतृत्वाची भूमिका देण्यात आली आहे”, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात महिलांची मध्यवर्ती भूमिका सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेचाही  पुनरुच्चार केला. जन धन खाते, मुद्रा योजना आणि स्वरोजगार योजना या उद्देशांसाठी  योगदान देत आहेत, असे  त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांही सांगितल्या. 7.5 लाख शहरी गरीब कुटुंबांना याआधीच घरे मिळाली आहेत. 4.5 लाख मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.  रास्त भाडे योजना आणि स्वानिधी योजना देखील ग्रामीण गरीब आणि मध्यमवर्गीय वर्गाला मदत करत आहेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. कल्याणकारी उपाययोजनांसोबतच राज्यातील औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही काम सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गुजरातमधील पर्यटन विकासाच्या उपाययोजनांमुळे वडोदऱ्याला  मोठा फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले. पावागड, केवडिया ही गावे पर्यटन केंद्रे  म्हणून विकसित झाली आहेत. वडोदऱ्यामध्ये  रेल्वे आणि विमान वाहतुकीच्या  पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय विद्यापीठ, रेल विद्यापीठ, बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ यामुळे  शैक्षणिक क्षेत्रात नवी ऊर्जा, चैतन्य येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

कार्यक्रमांचे तपशील:

पंतप्रधानांनी 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये  357 किमी लांबीची मालवाहतूक समर्पित मार्गिकेचा  न्यू पालनपूर – मदार विभाग आहे. 166 किमी लांब अहमदाबाद-बोटाद  विभागाचे   ‘गेज’ रूपांतरण; 81 किमी लांबीच्या पालनपूर – मिठा विभागाचे विद्युतीकरण या  कामाचा समावेश आहे.  सुरत, उधना, सोमनाथ आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी आणि रेल्वे क्षेत्रातील इतर उपक्रमांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे ‘लॉजिस्टिक’  खर्च कमी होण्यास आणि उद्योग आणि कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल. तसेच  प्रदेशातील संपर्क व्यवस्‍थेमध्‍येही  सुधारणा होणार आहे; त्यामुळे प्रवाशांना मिळणा-या  सुविधा वाढणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, शहरी भागात सुमारे 1,800 कोटी रुपयांची घरे आणि ग्रामीण भागात 1,530 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची घरे यांच्यासह एकूण 1.38 लाख घरे पंतप्रधानांच्या हस्ते समर्पित करण्‍यात आली. याशिवाय 310 कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 3000 घरांच्‍या कामाचा मुहूर्त करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी, पंतप्रधानांनी खेडा,  आणंद, वडोदरा, छोटा उदेपूर आणि पंचमहाल इथल्या 680 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण केले तसेच पायाभरणी केली.  या प्रदेशातील राहणीमान सुलभ करण्याचे उद्दिष्ट ही कामे करण्‍यामागे आहे.

गुजरातमधील दभोई तालुक्यातील कुंधेला गावात गुजरात केंद्रीय विद्यापीठाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. वडोदरा  शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेले हे विद्यापीठ सुमारे 425 कोटी रुपये खर्चून बांधले जाईल आणि यामुळे  2500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या गरजा पूर्ण करेल.

माता आणि बाल आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी ‘मुख्यमंत्री मातृशक्ती योजना’ सुरू केली.  या योजनेसाठी 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत गरोदर आणि  स्तनदा मातांना दर महिन्याला अंगणवाडी केंद्रातून 2 किलो काबुली चणे, 1 किलो तूर डाळ आणि 1 किलो खाद्यतेल मोफत दिले जाणार आहे. पंतप्रधानांनी ‘पोषण सुधा योजने’साठी सुमारे 120 कोटी रुपये वितरित केले, त्याचा लाभ आता राज्यातील सर्व आदिवासी लाभार्थींना  मिळू शकणार आहे. यासाठीच  या  योजनेचा विस्‍तार केला आहे.  आदिवासी जिल्ह्यातील गरोदर आणि स्तनदा मातांना लोह  आणि कॅल्शियमच्या गोळ्या आणि पोषणाबाबतचे शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हे पाऊल उचलण्‍यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...