मुंबई दि. 28 (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव डॉ. सरोज पांडे आणि राष्ट्रीय संघटनेचे सचिव व्ही. सतीश यांनी सर्व खासदार, आमदार, नगरसेवक आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सहभागी होण्याचे निर्देश दिले. मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी स्मृती भवन दादर येथे प्रथमच कार्यकारी समितीची बैठकी आयोजित केली होती. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात एकत्र येण्यासाठी पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
यावेळी बोलताना मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या नेतृत्वात भाजपा हा देशातील सर्वात मोठा आणि बलाढ्य पक्ष बनला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्षाला बळकटी मिळाली आहे. आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता संपादन करणार आहोत. परंतु प्रत्येक स्तरावर जबाबदारीने काम केल्यानेच ही सत्ता संपादन करणे शक्य होणार आहे .” असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत पक्षाच्या महासचिव डॉ. सरोज पांडे यांनी खासदार, आमदार, नगरसेवक आणि जिल्हाध्यक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचे लक्ष्य निश्चित करण्याचा सल्ला दिला. राष्ट्रीय संघटनेचे सचिव व्ही. सतीश म्हणाले की, “पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका जिंकून पक्षाला सत्तेत आणण्याचा संकल्प पक्षाने घ्यावा. कार्यकारी समितीच्या बैठकीत नवनियुक्त मंत्री आशिष शेलार आणि योगेश सागर तसेच नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक आणि खासदार गोपाळ शेट्टी यांचे स्वागत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली केले गेले.
भाजपचे सदस्यता अभियान, युवा शक्ती अभियान आणि शक्ती सन्मान अभियान कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि या तीन कार्यक्रमांच्या संचालनाचा तपशील जिल्हास्तरावर घेण्यात आला. त्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात १ ऑगस्टपासून सुरू होणारी ‘महा जनादेश’ यात्रा यशस्वी करण्यासाठी बूथ स्तरावर संघटना अधिक मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत मुंबईचे सर्व आमदार, नगरसेवक जिल्हाध्यक्ष तसेच मुंबई प्रदेश भाजपा कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना आणि युवा मोर्चाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा आणि सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांना या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीचे सूत्र संचालन नगरसेवक सुनील यादव यांनी केले तसेच नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


