मराठी रुपेरी पडद्यावर सध्या फ्रेश जोडय़ांचा बोलबाला आहे. अशीच एक जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एस. एन मुव्हीज निर्मित व सतीश रणदिवे दिग्दर्शित ‘प्रेमकहानी’ एक लपलेली गोष्ट या आगामी मराठी चित्रपटात अभिनेत्री काजल शर्मा व ‘महाराणा प्रताप’ फेम फैजल खान ही नवी फ्रेश जोडी पहायला मिळणार आहे.
प्रेम… प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. पण प्रेमाचा अर्थ मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो. कुणी प्रेमात सर्वस्व गमावतं तर कुणाला प्रेमातच सर्वस्व सापडतं. कधी ते नकळत येतं आणि सगळं आयुष्यच व्यापून टाकतं. प्रेमाची ही अनोखी कहाणी सांगणारा ‘प्रेमकहानी’ एक लपलेली गोष्ट हा चित्रपट येत्या २९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री काजल शर्मा हा नवा चेहरा मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘प्रेमकहानी’ एक लपलेली गोष्ट चित्रपटासाठी काजलने खूप मेहनत घेतली आहे. काजलबरोबर मुख्य भूमिकेत असलेला ‘महाराणा प्रताप’ फेम फैजल खान हासुद्धा या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करतोय.
लालचंद शर्मा निर्मित या चित्रपटात प्रेमाच्या सुरेख परिभाषेसोबत महाराष्ट्र व राजस्थान अशा दोन संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. मुंबई ते मॅारिसस, बळीराजाचं राज्य येऊ दे, दुसऱ्या जगातली, माहेरची माया, बहुरूपी या आणि अशा अनेक सिनेमांचे अनुभवी दिग्दर्शक सतीश रणदिवे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
आमचा हा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. यामुळे खूप चांगला अनुभव आम्हा दोघांनाही मिळालेला आहे. ही कथा खूपच रंजक असल्याने प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल, असा विश्वास काजल व फैजलने व्यक्त केला. या चित्रपटात या दोघांबरोबर उदय टिकेकर, किशोरी शहाणे-वीज, मिलिंद गुणाजी, निशिगंधा वाड, समीरा गुजर, डॉ. विलास उजवणे, कौस्तुभ दिवाण, राकेश, वैष्णवी रणदिवे यांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक हीचं आयटम सॉंग ही चित्रपटात आहे.
.चित्रपटाची कथा सतीश रणदिवे यांनी लिहिली असून संवाद राज काजी, अभिजीत पेंढारकर यांनी लिहिले आहेत. योगेश, राजेश बामुगडे, प्रवीण कुवर यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना बेला शेंडे, शाल्मली खोलगडे, भारती मढवी, पामेला जैन, जावेद अली यांच्या स्वराचे कोंदण लाभले असून प्रवीण कुवर यांची संगीत साथ आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी आशिष पाटील, ओंकार शिंदे, माया जाधव, कार्तिक पॅाल यांनी सांभाळली आहे. वेशभूषा पूनम चाळके पवार यांची आहे. छायांकन विजय देशमुख यांचे असून संकलन विजय खोचीकर यांचे आहे. २९ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.