पुणे दि.29: ‘बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट)’ प्रकल्पातून गटशेतीच्या धर्तीवर परंतू खरेदीदाराच्या समावेशासह मूल्यसाखळी विकासासाठी राज्याचे कृषि आयुक्त आणि स्मार्टचे प्रकल्प संचालक धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या 461 समुदाय आधारित संस्थांना सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे.
मान्यता देण्यात आलेल्या संस्थांमध्ये 419 शेतकी उत्पादक कंपन्या आणि 42 महिला बचत गटांच्या फेडरेशनचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गत विविध पिकांच्या सर्वसमावेशी आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्या विकसीत करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गटांचे फेडरेशन यांचेकडून अर्ज मागविण्यात आले होते. राज्यातील 5 हजार 767 संस्थांनी अर्ज केले होते. संस्थांनी सादर केलेल्या मूल्यसाखळी मंजूर उपप्रकल्प किंमतीच्या 60 टक्क्यापर्यंत अनुदान स्मार्ट प्रकल्पातून देण्याचे प्रस्तावित आहे.
सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी मान्यता दिलेल्या संस्थांनी अटी व शर्तीच्या अधीन राहून 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. निकषांच्या आधारे गुणात्मकरित्या निवड केलेल्या अहवालांना अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा नमुना स्मार्ट प्रकल्पाने उपलब्ध करून दिला आहे. स्थानिक सनदी लेखापाल, सनदी अभियंता आणि कृषि विभागातील क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी यांच्या मदतीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावयाचा आहे. यासाठी प्रकल्पातर्फे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. या संदर्भातील अधिक माहिती प्रकल्पाच्या http://smart-mh.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे यांनी कळविले आहे.