मुंबई, दि. २५ जून – मराठा आरक्षण मिळविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता उठवू सारे रान…या स्वरुपात मराठा आरक्षणाचा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल. त्यामुळे राज्य सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर विधानसभेत चर्चा करावी, त्यानंतर कोण चुक व कोण बरोबर याचा पर्दाफाश राज्यातील जनताच करेल अशी जोरदार टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
मराठा आरक्षणावरुन संपूर्ण राज्यात रान पेटलेलं असताना आज नवी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद पार पडली त्यावेळेस बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास गटात घेऊन नोकरी आणि शिक्षणामध्ये जे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मिळवून दिले होते. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवून ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयशी ठरली. परंतु यावर तोडगा काढायचे सोडून राज्य सरकार फक्त केंद्रावर आरोप करण्याचे काम करत आहे. विधिमंडळाच्या सभागृहात आम्ही येतो, तुम्ही सुद्धा या…असे आव्हानही त्यांनी केले.
दरेकर म्हणाले, आमच्या कथनी आणि करणीत अजिबात फरक नाही. मराठा समाजाच्या मागे भाजप उभा आहे. हा मराठा समाजाच्या अस्मितेचा व भवितव्याचा प्रश्न असून आज मराठा समाज आपल्या हक्कासाठी एकवटला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात असंतोष निर्माण होत आहे. इतर कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी आम्ही लढत आहोत. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज तुमचं सत्तेत राहून मलिदा खाण्याचं स्वप्न उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकर यांनी यावेळी दिली.
मराठा आरक्षण मिळविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही प्रविण दरेकर यांचा सरकारला इशारा
Date:

