मुंबई दि. २२ एप्रिल- पालघर च्या घटनेनंतर पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही असे सांगणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या तत्परतेने व घाई घाईत गुन्हेगारांची यादी जाहीर केली, त्याच तत्परतेने या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोण कोण आहेत व ते कोणाशी संबंधित आहेत, त्यांचे फोटो आणि नावे त्याच तत्परतेने जनतेसमोर जाहीर करावीत असे आवाहन विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना केले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य काशीराम चौधरी, पंचायत समिती सदस्य सीताराम चौधरी, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सुनिल रावते रामदास असारे यांचा समावेश आहे. यांचीही नावे गृहमंत्र्यांनी जनतेसमोर जाहिर केल्यास यामध्ये कोणाचा हात आहे हे स्पष्ट होईल असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्रे रक्ताने भिजली याचे राजकारण करू नये अशी टीका सामना मधून करण्यात आली असून त्याचा समाचार घेताना दरेकर यांनी सांगितले की, भगवी वस्त्रे रक्ताने लाल झाली आहेत त्याचे काय…भगव्यावर झालेला हा लाल रक्ताचा हल्ला भगवी विचारधारा घेऊन राज्यकारभार करणा-यांना आता धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारा वाटतो, कारण खुर्ची ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपेक्षा मोठी व महत्त्वाची ठरल्याचे दिसत आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली.
कोरोनाच्या भीषण पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसाच मृत्यू दरही वाढतोय हे गंभीर आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आयसीएमआर च्या निकषानुसार चाचणी करण्याची केलेली सूचना योग्य आहे. ज्यांना रुग्णालयाची सेवा उपलब्ध झाली नाही, असे कोरोना न झालेले शेकडो रुग्ण मृत्यूमूखी पावले आहेत, त्यामुळे आता सरकारने ती यादीही जाहिर करावी, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
कोरोना सारख्या संकटकाळातही महाविकास आघाडीचे सरकार सापत्न भावनेने व सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोप करताना दरेकर यांनी सांगितले की, भंडारा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी बैठक मागितली असता जिल्हाधिका-यांनी वेळ नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळेस सध्या लोकप्रतिनिधी नसलेले राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते प्रफुल्ल पटेल हे मुंबईसारख्या रेड झोनमधून ग्रीन झोनमधून भंडारा येथे गेले असताना जिल्हाधिका-यांनी त्यांना बैठक दिली. रेड झोनमधून प्रफुल्ल पटेल ग्रीन झोन मध्ये कसे गेले असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होते ते राज्य सरकारला चालते पण भाजपने अथवा सामान्य जनतेने सोशल मिडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली तर मात्र पोलिस त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत आहेत, पण ही सूडाची भावना योग्य नाही असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
राज्यात विलगीकरणाची अवस्था देखील आज दयनीय आहे. विलग ठेवलेल्या संशयितांना शौचालय आणि खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था नाही. तसेच त्याची नीट तपासणीही होत नाही, त्यामुळे विलगीकरणात ठेवलेले रुग्ण अतिशय त्रस्त झाले आहेत, त्याकडे सरकारने गांभीर्याने व तात्काळ लक्ष द्यावे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते -गृहमंत्र्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींची नावे त्याच तत्परतेने जाहिर करावीत -विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर
Date:

