मुंबई दि. २० जून– शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे शिवसेनेच्या अंतर्गत आणि महाविकासआघाडी च्या अंतर्गत नेमकं काय चाललंय हे दाखवणारे पत्र आहे. शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. तसेच तळागाळातल्या शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे हे यामधून स्पष्ट दिसत असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.
महाविकास आघाडीचे सरकारमध्ये शिवसेना सत्तेतील प्रमुख पक्ष असुन त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे. शिवसेनेची सत्ता असली तरी सत्तेचा उपयोग शिवसेनेला होत नसुन या सत्तेचा पुरेपुर उपयोग काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस करून घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. मग अशा सत्तेचा उपयोग काय असा सवाल उपस्थित करुन आमदार सरनाईक यांनी फक्त एकट्या शिवसेना आमदाराचे नव्हे तर शिवसेनेतील सर्वच आमदरांची वस्तुस्थिती उघड केल्याचेही यातुन स्पष्ट होते.
आमदार सरनाईक यांच्या पत्राच्या माध्यमातून पंचवीस वर्षे भाजप सोबतची युती, पाच वर्षे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारच्या काळात आमदारांना मिळालेली वागणूक तसेच झालेला विकास या सगळ्यांचा तुलनात्मक आलेख समोर येत आहे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी पत्रातील एकच पॅरा वाचला
शिवसेना नेते संजय राऊत यांना आपल्या पक्षातील आमदारांनी पत्राद्वारे दिलेल्या शिवसैनिकांच्या त्यांच्या भावना महत्त्वाच्या वाटत नाहीत. तर त्यांनी फक्त त्या पत्रातील एकच पॅरेग्राफ सेंट्रल एजन्सीच्या मार्फत होणाऱ्या त्रासाच्या संदर्भात वाचला. यापेक्षा शिवसेनेचं दुसर दुर्दैव असू शकत नाही असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, या पत्रात राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या नाराजी संदर्भात आहे आणि मग संजय राऊत शिवसेनेची काळजी घेतात की राष्ट्रवादीची काळजी घेतात हे महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण माहिती आहे. पण शिवसेनेच्या बदललेले स्वरूप संजय राऊत सारखा नेत्यांच्या माध्यमातून पुन्हा अधोरखित झालं आहे.असेही त्यांनी स्पष्ट केले.

