शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा १२ डिसेंबर रोजी समारोप
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपा सरकार विरोधात दिनांक १ डिसेंबर २०१७ पासून राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. या राज्यव्यापी आंदोलनाचा समारोप नागपूर येथे मंगळवार, १२ डिसेंबर रोजी धनवटे नॅशनल कॉलेज मैदान, अजनी रेल्वे स्टेशन जवळ, नागपूर येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी दिली.
यावेळी खासदार गुलाम नबी आझाद, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्ष नेते अजित पवार, आमदार दिलीप वळसे – पाटील, आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, रमेश बंग, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. पुणे शहर, जिल्हा, पिंपरी -चिंचवड येथून सुमारे अडीच हजार कार्यकर्ते या समारोप कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्या करीता हे आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन राज्यव्यापी असून महागाई, पेट्रोल दरवाढ, नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न तसेच राज्याचे महत्वाचे प्रश्न या आंदोलनाद्वारे मांडण्यात येत आहे.
आंदोलनादरम्यान दिनांक १ ते १२ डिसेंबरमध्ये यवतमाळ ते नागपूर अशी १५३ किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली आहे.
आंदोलनाविषयी अधिक माहिती देताना वंदना चव्हाण म्हणाल्या ‘भाजप आणि शिवसेना सत्तेवर येऊन ३ वर्षे ओलांडली आहेत. या काळात ते अपयशी ठरले आहेत, केवळ पोकळ आश्वासन देणे आणि जनतेची फसवणूक या सरकारने केली आहे. सर्व स्तरावर राज्य सरकार भरकटलेले आहे. अनेक पोकळ अश्वासने देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. विना अट आणि सरसकट कर्ज माफी, शेतीमालासाठी हमी भाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबीयांना मदत, महिला सुरक्षा, वाढती महागाई, पेट्रोल, डीझेल, गॅस दरवाढ, शिक्षण आणि शिष्यवृत्तीमधील गोंधळ, भारनियमन, नोटबंदी, जीएसटी, निकृष्ट नागरी सुविधा आणि आरोग्य व्यवस्था, कुपोषण, बालमृत्यू, शेती, उद्योग, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यांचा बोजवारा आणि सरकारच्या एकूणच अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी व तसेच दुर्बल घटकांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून सरकारवर हे हल्लाबोल आंदोलन केले.’ असे खा. वंदना चव्हाण म्हणाल्या.