‘ओन्ली एचआर’ संस्थेच्या संमेलनात गिर्यारोहक उमेश झिरपे यांचा ‘सक्सेस मंत्र’
पुणे :
‘कंपन्या चालविताना कॉर्पोरेट व्यवस्थापकांना, मनुष्य बळ विकास खात्यातील अधिकार्यांना लागणारे साहस, ‘टीम बिल्डींग’, ‘टीम स्पिरीट’ चे मंत्र आणि नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता गिर्यारोहणातून मिळू शकते, त्यामुळे सतत पर्वतराजीत राहून गिर्यारोहणाची सवय लावून घ्यावी’, अशा शब्दात प्रसिद्ध गिर्यारोहक, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे यांनी गुरुवारी सायंकाळी झालेल्या अनुभवकथनातून ‘टीप्स’ दिल्या.
निमित्त होते, ‘ओन्ली एचआर’ या संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या संमेलनाचे ! गुरुवारी सायंकाळी हे संमेलन घोले रस्त्यावरील ‘पंडित नेहरू सभागृह’ येथे झाले. कॉर्पोरेट कंपन्यांच्या मनुष्य बळ विकास खात्यात कार्यरत अधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी मोठया संख्येने या संमेलनाला उपस्थित होते.
‘मुबीआ ऑटोमोटिव्ह काँपोनंटस् प्रा. लि.’ या कंपनीच्या एडमंड डिसिल्वा यांना ‘आउटस्टँडिंग एच. आर. प्रोफेशनल अवॉर्ड २०१७’ देऊन गौरविण्यात आले. ‘एमपीटीए एज्युकेशन लि.’ चे व्यवस्थापकीय संचालक सदानंद देशपांडे यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले.
यावेळी बोलताना उमेश झिरपे म्हणाले, ‘आयुष्यात थोडे तरी साहस केले पाहिजे. भारतात लहानपणापासून जपून राहण्याची, सतत सांभाळून राहण्याची शिकवण दिली जाते. मोठे झाल्यावर मात्र, प्रत्येक गोष्टीत धाडसाची अपेक्षा ठेवली जाते. आव्हाने पेलण्याची अपेक्षा ठेवली जाते. सतत स्वतःला जपत राहिल्यावर अंगात धाडस कुठून येणार ? मग तरुणपणीच नैराश्य, अपयशाने खचून जाणारी पिढी पाहायला मिळते. म्हणून परदेशात साहसी खेळ दर आठवड्याला खेळले जातात. लष्करी प्रशिक्षणाचाही आग्रह धरला जातो. भारतात आपण किमान गिर्यारोहण आणि साहसी खेळाचा आग्रह धरला पाहिजे.’
‘रोज नवीन आव्हाने कॉर्पोरेट क्षेत्रात येतात, अशावेळी साहसी खेळ आणि गिर्यारोहण तुम्हाला आव्हाने पेलण्याची क्षमता, साहस, धैर्य देते. गटबांधणी (टीम बिल्डिंग), ‘टीम स्पिरीट’ शिकवते. व्यवस्थापनाचे धडे गिर्यारोहणातून मिळतात. पर्वतात गेल्याने उत्साह मिळतो, कार्यक्षमता वाढते.’
एव्हरेस्ट विजयाची गाथा सांगताना ते म्हणाले,‘सामान्य माणसांपर्यंत गिर्यारोहण नेण्याच्या उद्देशाने ‘गिरीप्रेमी’ संस्थेने एव्हरेस्ट मोहीम आखली. पुण्यात ११ एव्हरेस्टवीर राहतात, ही अभिमानाची बाब आहे. २५ हजार नागरिकांना साडेतीन कोटी उभारून २०१२ ची आमची मोहीम यशस्वी केली. आता, जगातील ८ हजारापेक्षा उंच अशी १४ शिखरे पादाक्रांत करण्याचे ध्येय ‘गिरीप्रेमी’ संस्थेने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यातील ६ शिखरे पादाक्रांत करण्यात यश आले असून, उर्वरित मोहिमांचे नियोजन चालू आहे.’
विश्वस्त प्रशांत इथापे, प्रदीप तुपे, शैलेंद्र देशपांडे, सचिन लांडगे, विपीन घाटे यावेळी उपस्थित होते. विश्वस्त सुधीर फाटक यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त जितेंद्र पेंडसे यांनी स्वागत केले तर निखिल शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले.