गीतकार शैलेंद्र यांच्या आठवणींना उजाळा !
पुणे :जुन्या पिढीच्या हिंदी चित्रपटगीतांच्या रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘तू प्यार का सागर है ‘सारख्या भावनाप्रधान गीतांपासून कामगारांच्या मोर्चाला प्रेरणा देणाऱ्या ‘हर जोर -जुल्म की टक्कर मे ‘सारखे संघर्षगीत लिहिणाऱ्या गीतकार शैलेंद्र यांच्या स्मृतींना आज बुधवारी उजाळा मिळाला ! २८ संगीतकारांच्या १७५ चित्रपटांसाठी ७७५ गीते लिहिणाऱ्या गीतकार शैलेंद्र यांची जीवनगाथाच रसिकांसमोर उलगडली !
‘रसिक मित्र मंडळ’च्या ‘एक कवी -एक भाषा’ या मासिक व्याख्यानमालेत आज बुधवारी प्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांच्यावर विजय पाडळकर यांच्या दृक श्राव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला . ‘रसिक मित्र मंडळ’ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी स्वागत केले . अध्यक्षस्थानी मधू पोतदार होते . या व्याख्यानमालेचे हे ५२ वे पुष्प होते .
विजय पाडळकर यांनी शैलेंद्र यांच्या कार्यकर्तृत्व ,शैलीचा अभ्यासपूर्ण परिचय करून दिला . ते म्हणाले ,’शैलेंद्र हे एकमेवाद्वितीय गीतकार होते . गुलझार ,नक्श लायलपुरी ,जावेद अख्तर यांनीही शैलेंद्र यांची थोरवी सांगितली ,यातच शैलेंद्र यांचे मोठेपण उठून दिसते . देशभक्तीपर गीतांसाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला . मथुरेवरून मुंबईला आल्यावर त्यांची कारकीर्द बहरली . पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या शैलेंद्र यांनी कामगारांच्या लढ्यातही भाग घेतला . ‘न्योता और चुनौती ‘सारखे पुस्तक अण्णाभाऊ साठे याना अर्पण केले . इप्टा ,रायटर्स असोसिएशन सारख्या संघटनांचे प्रतिनिधित्व केले .
त्यांच्या ‘बरसात ‘,’आवारा ‘,’अनाडी ‘,जागते रहो ‘ या राज कपूरच्या चित्रपटात लिहिलेल्या गीतांनी रसिकांना वेड लावले . ‘मधुमती ‘,’परख ‘,’गाईड ‘मधून शब्दांचे गारुड कायम राहिले .
‘मंझिल वही है प्यार की ‘,जागो मोहन प्यारे ‘,तू प्यार सागर है ‘,जीना इसिका नाम है ‘,ओ सजना ,बरखा बहार आयी ‘,’आज फीर जीने की तमन्ना है ‘ अशा शैलेंद्र गीतांचे दृक श्राव्य प्रसारण या कार्यक्रमात करण्यात आले . जुन्या पिढीच्या भरलेल्या सभागृहाने या गीतांना दाद दिली .
‘शैलेंद्र यांच्या १० गीतांमध्ये रिमझिम हा शब्द आणि पावसाचे वर्णन आहे असे सांगून रसिकांच्या मनावर शैलेंद्र साठी जे सिंहासन आहे ,त्याची जागा कोणी घेऊ शकला नाही ‘असे सांगून विजय पाडळकर यांनी समारोप केला . यावेळी प्रदीप निफाडकर,मंदा कुलकर्णी ,रमेश गोविंद वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते