मनोरंजन संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी यांचे निधन

Date:

पुणे : सलाम पुणे पुरस्काराचे मानकरी,जेष्ठ रंगकर्मी,अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे शाखेचे माजी अध्यक्ष आणि मनोरंजन,पुणे(पब्लिसीटी) संस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर चिंतामण कुलकर्णी( अण्णा) यांचे आज.दि.16 / 4 / 2020 रोजी पहाटे 5 वाजून 20 मिनीटानी वृद्धापकाळाने निधन झाले.ते ९२ वर्षांचे होते . ५० वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००० साली शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळाला होता. पुणे मनपाचा २०१७ सालचा बालगंधर्व पुरस्कार मिळाला होता . त्यांच्या मागे मोहन ,मदन हे दोन मुले ,मीना ही कन्या ,सून ,नातवंडे असा परिवार आहे .सांस्कृतिक क्षेत्राचा भक्कम आधार म्हणून ते ओळखले जात. मनोरंजन संस्थेचे संचालक मोहन कुलकर्णी यांचे ते पिता होत. सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले
मनोहर चिंतामण कुलकर्णी उर्फ अण्णा यांचा अल्पपरिचय.
जन्म. ३ जानेवारी १९२८
आपल्या परिचितांच्या मध्ये ते अण्णा या नावाने प्रसिद्ध होते. एक नट, एक निर्माता आणि नाटकांचा जाणकार ही अण्णांची रूपे असली तरी अण्णा ओळखले जात असत ते नाटय़संस्थांच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणारे व्यवस्थापक म्हणून. मराठी नाट्यसृष्टीचा चालता बोलता इतिहास अशी ओळख असलेले मनोहर चिंतामण कुलकर्णी यांनी ‘अश्रूंची झाली फुले’मधील प्रोफेसर विद्यानंदाची प्रमुख भूमिका, ‘लग्नाची बेडी’ मधील पराग, तर ‘तुझं आहे तुझपाशी’ मधील डॉ. सतीशची भूमिका रंगवणारी व्यक्ती ‘भावबंधन’, ‘म्युन्सिपाल्टी’, ‘घराबाहेर!’,‘उद्याचा संसार’ यासह ८ ते १० नाटकांमध्ये विविध भूमिका केल्या होत्या.
१९५० पासून ते सरस्वती मंदिर नटसंघात काम करत होते. १९५६ मध्ये आपल्या मित्रांच्या मदतीने कराडमध्येही नाटकांचे व्यवस्थापन केले. हे सर्व पोस्टाच्या ‘आरएमएस’ विभागातील नोकरी सांभाळून ते करत होते. नोकरीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतच होते. त्याचबरोबर टपाल विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या नाटय़स्पर्धामध्ये ते सहभागी होत असत. या स्पर्धामध्येच त्यांना नाना रायरीकर हा नाटकवेडा मित्र मिळाला. हे सारे सुरू असताना १९६१ मध्ये पुण्यात त्यावेळी बहुरुपी रंगमंदिर या खुल्या नाटय़गृहाची सुरुवात झाली. नू. म. वि. व भावेस्कूलच्या पटांगणावर विविध नाटके होत. या नाटकासाठी मंडप उभारून तसेच नाटय़गृह उभारून तेथे प्रयोग होत. या पटांगणांवर उभारल्या जाणाऱ्या थिएटरला ‘बहुरंगी’ रंगमंदिर असे संबोधले जाई. चारुदत्त सरपोतदार, चित्तरंजन कोल्हटकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी त्यावेळी काम केले. हे तिघे जण या ठिकाणी वासंतिक नाटय़महोत्सव भरवत असत. या संपूर्ण महोत्सवाची जबाबदारी अण्णा आणि त्यांचे मित्र नाना रायरीकर सांभाळत असत यासाठी अण्णांना मित्रांचेही सहकार्य मिळे. त्या पुढील काळात पुण्यात बालगंधर्व, टिळक ही नाटय़गृहे सुरू झाली. पुण्यात नाटय़ व्यवस्थापन करणाऱ्यांची तीव्र गरज भासू लागली. मनोहर कुलकर्णी यांनी नेमकी ही गरज लक्षात घेऊन नाटक उभे राहिपर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या एका छत्राखाली देण्यासाठी नाना रायरीकर आणि मु. रा. तथा डॅडी लोणकर या दोघांसह ७० मध्ये ‘मनोरंजन’ ही संस्था सुरू केली. नाटय़ व्यवस्थापन हा शब्दही फारसा प्रचलित नसण्याच्या काळात नाटकासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात अण्णांनी बिनधास्त भरवसा ठेवावा अशी संस्था सुरू करून नाटकवाल्यांसाठी विविध सेवा देण्यास सुरुवात केली. पुण्यातील नाटय़व्यवस्थापन क्षेत्रात ‘मनोरंजन’ ही ‘पायोनियर’ संस्था ठरली. आपण नाटकासारख्या कलेच्या क्षेत्रात धंदा नव्हे तर व्यवसाय करत आहोत. हा प्रांत वेगळा आहे, याचे भान अण्णा आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांना होते. त्यामुळे हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा नाटय़क्षेत्रातील तीनही प्रकारच्या मंडळींना अण्णा आणि ‘मनोरंजन’ ही संस्था आपली वाटत राहिली, वाटत राहील. नाटक उभे करण्यासाठी निर्माता दिग्दर्शकाला प्रयोग आणि त्याचे सादरीकरण करण्यासाठी पूर्ण लक्ष देता यावे यासाठी या दोन दर्शनी कामाशिवाय ज्या अन्य सर्व जबाबदाऱ्या असतात त्या ‘मनोरंजन’ पार पाडते. त्यामागे अण्णांची मेहनत, दृष्टी व कामाची पद्धत याचा खूप मोठा वाटा आहे. गेली पन्नास वर्ष अण्णा ‘नाटय़व्यवस्थापन’ या संकल्पनेचे कृतिशील प्रयोग करत आहेत. नाटय़व्यवस्थापनात त्यांनी जे काम केले आहे ते कोणत्याही व्यवस्थापनाच्या पुस्तकापलीकडचे आहे. कायम अचूक आणि अत्यंत वेळेवर करावे लागणारे व दररोज नवे आणि ‘रिझल्ट ओरिएंटेड’ असे हे काम व्यवस्थापनाच्या एखाद्या इन्स्टिटय़ूटसारखे आहे.
व्यवसाय करत असतानाही केवळ पैशाला महत्त्व न देता कलेला त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांना सोसाव्या लागलेल्या आर्थिक झळीची कल्पनाही कोणाला येणार नाही. अनेकांना नाटय़ व्यवसायात आलेल्या अडचणी किंवा नाटकाचे अपयश किंवा अन्य काही कारणे असोत पण त्यामुळे ‘मनोरंजन’ ने केलेल्या व्यवस्थापनाच्या कामाचे रास्त बिल बुडण्याचे अनेक प्रसंग आले. अण्णांनी ते मनावर घेतले नाही किंवा त्याचा इश्शूही केला नाही. प्रायोगिक नाटकवाले किंवा विविध एकांकिका स्पर्धातील तरुण कलावंत यांना मनोरंजनने नेहमीच सहकार्य केले. नाटय़निर्माता म्हणून नाटकाची निर्मिती करतानाही अण्णांनी ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या वेगळ्या धाटणीच्या नाटकाची निवड केली. या नाटकाला विविध पुरस्कारही मिळाले. नाटय़परिषदेवर काम करताना नाटय़निर्मात्यांकडून प्रत्येक प्रयोगामागे ५ रु. देणगी घेऊन परिषदेला ५० हजार रुपये मिळवून दिले. कुशल संघटक म्हणून हे काम करताना छोटय़ा उपक्रमातूनही जर तो निष्ठेने व चिकाटीने राबवला तर किती उत्तमपणे तो करता येऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. अण्णांनी निर्मिती केलेल्या ‘उजळल्या दिशा’ या नाटकासही विविध पुरस्कार मिळाले. दलित जीवनावरील विविध समस्यांवर असलेले हे नाटक वेगळ्या धर्तीचे. अण्णांनी अशी वेगळ्या धर्तीची नाटके व्यावहारिक हिशेब न बघता केली ती एक ‘रंगकर्मी’ म्हणून, रंगभूमीशी आपली जी बांधिलकी आहे त्यातूनच. विविध पुरस्कार, गौरव, सत्कार त्यांच्याकडे चालत आले. एखाद्या क्षेत्राला वाहून घेऊन त्यात अविरत काम करून त्यांनी ‘नाटय़व्यवस्थापन’ या नाटय़क्षेत्रातील अविभाज्य घटकाला वेगळे स्थान मिळवून दिले. एक निर्माता, नाटय़परिषदेच्या कामातून आपले कौशल्य दाखवणारे कुशल संघटक, कलाकार अशी विविध रूरुपातून त्यांनी आपली ‘चतुरस्त्र रंगकर्मी’ ही ओळख निर्माण केली आहे. नाटय़क्षेत्रात आज मनोहर कुलकर्णी ही व्यक्ती नाही तर एक संस्था बनले होते. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मनोहर कुलकर्णी यांना २००० साली शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळाला होता. पुणे मनपाचा २०१७ सालचा बालगंधर्व पुरस्कार मिळाला होता.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...