‘श्यामची आई ‘ स्मृती शताब्दी निमित्त साने गुरुजींच्या जन्मगावी अभिवादन !
पुण्याच्या साने गुरुजी स्मृती समितीचा पुढाकार
पालगड :श्यामची आई म्हणजे यशोदा सदाशीव साने यांचा स्मृती शताब्दी कार्यक्रम आज ( २ नोव्हेंबर ) साने गुरुजींचे जन्मस्थळ पालगड येथे साने गुरुजींच्या आता स्मारक असलेल्या निवासस्थानी झाला.
निवृत्त मुख्याध्यापक,साने गुरुजी स्मृती समितीच्या उपाध्यक्ष आणि’पेन्शनर्स असोसिएशन दापोली’च्या संचालक वसुधा बीडकर यांनी यशोदा साने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मंगेश गोंधळेकर यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
साने गुरुजी स्मारक पालगड येथे झालेल्या कार्यक्रमाला साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष शरद केळकर, खजिनदार डॉ. अशोक गोंधळेकर,
सौ. वैशाली जोशी, मुख्याध्यापक बी. डी.पाटील, मंगेश गोंधळेकर, प्राचार्य यदमलकर, विकास वाचनालयाच्या ग्रंथपाल सुलभा कदम,सौ. फडके , शिक्षक वर्ग, ग्रामस्थ, उद्धव सुपेकर, सौ. आठल्ये इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘ सारखी साने गुरुजी लिखित गीते यावेळी विद्यार्थांनी म्हटली. प्रणव करमरकर या विद्यार्थाने श्यामच्या आईची महती सांगीतली. श्री. पेवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
ग्रामपंचायत पालगड येथेही संतोष दळवी, विद्याधर जोशी, मालती सुंदर जाधव आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्यामची आई स्मृती शताब्दी कार्यक्रम पार पडला.