भाषा जपावीच, पण, कंटेंट जास्त सांभाळा ‘ : परिसंवादाचा सूर
पुणे:
‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल ‘ मधील ‘ समाजाची बदलती भाषा ‘ या परिसंवादाला शनीवारी दुपारी चांगला प्रतिसाद मिळाला.पं. नेहरु सभागृहात हा परिसंवाद चांगलाच रंगला. सतत बदलत जाणारी भाषा जपावीच, पण, कंटेट जास्त सांभाळा ‘ असा या परिसंवादाचा सूर होता !
‘शतरंज के खिलाडी ‘, ‘उमराव जान ‘ सारख्या हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ संवाद लेखक जावेद सिद्दीकी, पत्रकार विजय चोरमारे, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पत्रकार सचिन चपळगावकर, अॅड. सुजाता पाठक, शॉर्ट फिल्म दिग्दर्शक श्रावण खरात या परिसंवादात सहभागी झाले.
संवाद लेखक जावेद सिद्दीकी म्हणाले,’ लेखक लिहितो तेव्हा तो स्वतः बोलत असतो, पण चित्रपटातील पात्र बोलते, तेव्हा ती पात्राची भाषा असावी लागते. पुढची पिढी देखील हे संवाद ऐकणार, वाचणार आहे, याचे भान ठेवले पाहिजे. भाषा बदलत आहे, पण ती अशीच बदलली पाहिजे का ? याचा विचार केला पाहिजे. म्हणी, वाक्प्रचार, जुन्या कथाची पखरण असलेली भाषा आपण विसरलो आहोत. एसएमएस ची नवीच भाषा जन्माला आली आहे.
सिद्दीकी पुढे म्हणाले, ‘आपल्या भाषेवर इतिहास, भूगोलाची छाप असते. भाषा बदलत गेली तरी लेखकाची जबाबदारी बदलत नाही.आपल्याला स्वतःच चांगल्या -वाईटाची सेन्सॉरशिप करता आली पाहिजे, त्यासाठी वेगळी समिती असली तरच ऐकू, असे वाटता कामा नये.टीव्हीवरचे डिबेटमध्ये चर्चक एकमेकांचे ऐकू शकत नाहीत, तर, आपण ते कसे ऐकू शकणार ?
इंटरनेट वर , वेब सिरीजवरची भाषा त्या ठिकाणी योग्यच आहे, असे वाटली तरी ती घसरून चालणार नाही.
पत्रकार विजय चोरमारे म्हणाले,’ आपण जो शब्द लिहितो, छापून येतो त्या साठी अनेकांना जबाबदार धरले जाते, त्यामुळं वृत्तपत्रात प्रत्येक शब्द जपून लिहावा लागतो. आताच्या काळात जबाबदारी अधिक वाढली आहे. घाई असणे ही तुमच्या चुकीचे समर्थन करता येत नाही. भाषेच्या व्याकरणापेक्षा कंटेंटची काळजी घेतली पाहिजे.
चपळगावकर म्हणाले, ‘ मीडिया हाऊसेसची भाषा बदलल्याने पत्रकारांना फार बदलता येत नाही. समाज माध्यमांची,राजकारण्यांची भाषा ही प्रभाव टाकत असते.टीआरपीची भाषा ही समाज संस्कृती जपणारी नाही.
अॅड. सुजाता पाठक म्हणाल्या, ‘ नाटकांची वाक्ये आता पल्लेदार नसतात, तर तुटक असतात. समाजाचेच प्रतिबिंब नाटकात पडत असते.
‘ आशय फिल्म यु ट्यूब चॅनेल ‘ चे श्रावण खरात म्हणाले, ‘इंटरनेट वर फिल्म करताना बंधने नसली, तरी स्वतःवर स्वतःची बंधने घालून घेणे हितकारक ठरते.
संयोजक मोनिका सिंग यांनी सर्वांचा सत्कार केला.आर जे तरुण यांनी सूत्रसंचालन केले.