-मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी स्नेह मेळावा उत्साहात.
आर्थिक संस्थांच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे: डॉ पी ए इनामदार
पुणे:
कोणतीही आर्थिक संस्था ही ग्राहकांचा विश्वास , संस्थेचे धोरण आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम यावर चालते. मुस्लिम बँकेच्या प्रगतीत अविरत परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे,असे प्रतिपादन मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी केले.
मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँके च्या कर्मचाऱ्यां नी आयोजित केलेल्या नव वर्ष स्नेह मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून डॉ पी ए इनामदार बोलत होते.
शनीवारी सायंकाळी हा मेळावा आझम कॅम्पस असेंब्ली हॉल मध्ये झाला. यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार, अधिकारी , कर्मचारी वर्ग, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
मुस्लिम बँकेच्या 26 शाखा असून 240 कर्मचारी आहेत. कर्मचारी कल्याणच्या अनेक योजना असून त्यामुळे कर्मचाऱ्यांची पुढची पिढी उच्च शिक्षण घेवून, उच्च पदस्थ आहे. दोन वर्षांतून एकदा विमानातून सहल आयोजित केली जाते. अशा कल्याणकारी योजनांमुळे कर्मचारी वर्ग संस्थेच्या प्रगतीसाठी मनापासून झटत असतो, असे यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हरून सय्यद यांनी सांगितले.
डॉ पी ए इनामदार म्हणाले,’ मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेने सर्व समावेशक धोरण ठेवून समाजातील सर्व घटकांना मदतीचा हात दिला. पुण्यातील आपत्कालीन प्रसंगी बँक नेहमी धावून जाते. कर्मचारी आणि ग्राहकांचे समाधान हेच उद्दिष्ट आर्थिक संस्थेचे असले पाहिजे’.
‘कर्मचारी वर्ग समाधानी असेल तरच तो ग्राहकांची आणि संस्थेची प्रगती करण्यास सक्षम राहू शकतो’, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ पी ए इनामदार यांचा अमृत महोत्सव निमित्त डॉ हारून सय्यद आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मनोरंजन संस्थेच्या ऑर्केस्ट्रा चे आयोजन या वेळी करण्यात आले होते.