पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१९’ जाहीर झाले आहेत.

शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पं.वसंत गाडगीळ(संस्कृत प्रसार आणि सर्वधर्मीय सलोख्यासाठी योगदान),महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड चे संस्थापक डॉ.विवेक सावंत(ग्रामीण भागातील रोजगारासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर),गाजीउद्दीन रिसर्च सेंटर,सोलापूरचे प्रमुख सर्फराज अहमद(इतिहास संशोधन), साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ,माणगाव चे व्यवस्थापक सतीश शिर्के(साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकच्या माध्यमातून बालकांवर संस्कार), युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर(युवक क्रांती दलाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर आंदोलनात्मक काम),भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष सतीश खाडे(ग्रामीण भागातील जलसंधारण) यांची निवड या वर्षीच्या ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’साठी करण्यात आली आहे.संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी ही माहिती दिली.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,आझम कॅम्पस परिवारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ साठी डॉ.एन.वाय.काझी, डॉ.अनिता फ्रान्त्झ आणि शबनम शोएब सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१९ चे वितरण मॅगसेसे पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या असेंब्ली हॉलमध्ये गुरूवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी डॉ.पी. ए. इनामदार यांचा ७५ वा वाढदिवस असून, सन्मानाचे अकरावे वर्ष आहे. सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

