सवलतीत 12 हजार डायलिसिस पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता सोहळा
पालिका आणि लायन्स संचालित ‘सौ. अरूणा नाईक डायलिसिस सेंटर’चा उपक्रम
पुणे :
गरीब, गरजू रुग्णांना केवळ 400 रुपयांत डायलिसिस करून देणार्या ‘सौ. अरूणा नाईक डायलिसिस सेंटर’ने विक्रमी 12 हजारावे डायलिसिस पूर्ण केल्याच्या निमित्ताने गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. हे डायलिसिस सेंटर पुणे पालिकेचे ‘कमला नेहरू हॉस्पिटल’ आणि ‘लायन्स क्लब पुना मुकुंदनगर’चा संयुक्त उपक्रम आहे.
या कृतज्ञता सोहळ्याला महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी आमदार मोहन जोशी प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सेंटरमध्ये 15 अद्ययावत डायलिसिस यंत्रे आहेत. सर्वसामान्य रुग्णांना येथे अल्पदरात डायलिसिस उपचार केले जातात. त्यातील वार्षिक 1 लाख रुपयांचे प्रति रुग्ण शुल्क महापालिकेतर्फे शहरी गरीब योजनेतून दिले जाते. या डायलिसिस केंद्राची उभारणी प्रकल्पप्रमुख नितीन नाईक यांनी केली आहे.
कार्यक्रमाला लायन्स क्लब इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल रमेश शहा, ओमप्रकाश पेठे, नगरसेवक योगेश समेळ, अजय खेडेकर, सौ. संगीता शेट्टी हे उपस्थित होते.
या कृतज्ञता सोहळ्यात रुग्णांना दिवाळी फराळ भेट देण्यात आला. प्रकल्पप्रमुख नितीन नाईक यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘या अद्ययावत डायलिसिस केंद्रामुळे नागरिकांना अल्पदरात सेवा उपलब्ध होत आहे. पालिकेतर्फे या केंद्राला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
शेखर चरेगावकर म्हणाले, ‘डायलिसिसचे उपचार आवश्यक असणार्या रुग्णांना हे उपचार परवडतातच असे नाही, त्यासाठी सहकार क्षेत्रातून सामाजिक निधी अशा उपक्रमांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या केंद्रामध्ये 98 टक्के रुग्ण शहरी गरीब योजनेतून उपचार घेतात. त्यानुसार वर्षभरासाठी एक लाख रुपयांची तरतूद एका रुग्णासाठी आहे.’