पुणे :’धर्मांधता बाजूला ठेवण्याचा पुरोगामी विचार देणारे कैफी आझमी हे शायर म्हणून समर्थ होते, कौमी एकतेचे, गंगा -जमना तहजीबचे प्रतिक होते ‘, असे गौरवोद्गार डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले.
रसिक मित्र मंडळातर्फे ख्यातनाम उर्दू शायर कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त निमित्त कैफी आझमी यांच्यावर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . त्यावेळी डॉ. देशमुख बोलत होते.
उर्दू अभ्यासक अनीस चिश्ती अध्यक्षस्थानी होते. पत्रकार संघ सभागृहात गुरुवार,२१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम झाला.
रसिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी स्वागत केले. प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले. रसिक मित्र मंडळ आयोजित हे ६३ वे व्याख्यान होते.
डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘धर्मनिरपेक्षता, समाजवादी विचारसरणीबद्दल आस्था कैफी आझमी यांना होती. शायर म्हणून ते समर्थ होते. त्यांनी लिहिलेला ‘ गर्म हवा ‘ सारखा फाळणीवरचा तरल सिनेमा झाला नाही.कैफी आझमी यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. ‘नसीम ‘, ‘हीर रांझा ‘, ‘गर्म हवा ‘ हे त्यांनी लिहिलेले चित्रपट हिंदीतील मानदंड होते.
लहानपणापासून कैफी आझमी तरल संवेदना असलेले कवी होते, त्यांच्याकडे उपजत नेतृत्वगुण होते. धार्मिक नेते न होता ते कम्युनिस्ट बनले याचे कारण त्यांना मानवतेबद्दल आस्था होती. त्यांना शायरी लिखाण करताना शमा, परवाना पेक्षा सामान्य माणसांच्या वेदनांची जाण होती.
बंडखोरी म्हणजे तारुण्य, तारुण्य म्हणजे कम्युनिझम असे जगात १९२५ ते १९६० पर्यंत वातावरण होते.कैफी आझमी याच प्रवाहात होते. कामगारांपासून वेश्यांपर्यंत शोषीत घटकांच्या संघटना त्यांनी बांधल्या. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन, इप्टा या दोन्ही संस्थांना त्यांनी भरपूर योगदान दिले.
सौंदर्याच्या परिभाषा बदलून कला, लेखनाला घाम आणि घट्टे पडलेल्या हातांकडे नेण्याचे काम प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनने केले. मामा वरेरकर, अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यिक या चळवळीत सहभागी झाले.
१९४३ मध्ये कैफी आझमी मुंबईत आले. आणि लेखनगुणांमुळे प्रसिध्द झाले. ‘कामगाराला क्रांतीप्रवण करण्यासाठी कामगाराला कळणाऱ्या भाषेत मला लिहिता आले पाहिजे ‘ , असे कैफी आझमी मानत. प्रेम आणि इन्कीलाब या दोन्ही भावनांचे मिश्रण त्यांच्या लिखाणात होते, असेही डॉ. देशमुख यांनी सांगीतले.
‘रोते,रोते गुजर गयी रात ‘, सारखी चांगली गीते लिहूनही कैफी आझमी हे कम्युनिस्ट . असल्याने सरकारला घाबरुन निर्माते त्यांना कामे देत नव्हते. १९६४ ला ‘हकिकत ‘ चित्रपटाने मोठे यश दिले. ‘ कर चल ए फिदा ‘, ‘ खिलौना मेरे दिलसे ‘ अशी गीते प्रसिद्ध झाली.
उतारवयात अर्धागवायू होऊनही मानवतावादी , धर्मनिरपेक्ष, दंगल विरोधी कामात, सद्भावना यात्रात त्यांनी स्वतःला झोकून दिले. सोशालिस्ट भारताचे त्यांचे स्वप्न विखुरले गेल्याने, भांडवलशाही मुक्त अर्थव्यवस्था आल्याने ते दुःखी असत. पण, शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले, विचार निष्ठेशी एकनिष्ठ राहिले. त्यांचे समाजसेवेचे व्रत त्यांची कन्या शबाना आझमी यांनी पुढे नेले.