दलित मतांची दलाली थांबावी :तुषार गांधी
पुणे :
अनेक दशकांच्या लढ्यानंतरही बहिष्कृत समाजाचे प्रश्न सुटले नसून मनातील जात संपली नाही ,म्हणून व्यापक जातीअंताची आणि परिवर्तनाची लढाई लढावी लागेल ,तसे करताना दलित मतांची दलाली थांबावी ‘ असा सूर आज सायंकाळी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ आयोजित परिसंवादात उमटला .
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘जाती संस्था और वर्तमान दलित राजनीती ‘ या विषयावरील परिसंवादाने राष्ट्रपिता गांधी सप्ताह चा समारोप झाला . समारोपाच्या परिसंवादात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ,गुजरातच्या दलित चळवळीतील युवा नेते जिग्नेश मेवाणी ,जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (दिल्ली ) मधील प्राध्यापक डॉ मिलिंद आव्हाड सहभागी झाले . अध्यक्षस्थानी डॉ कुमार सप्तर्षी होते .
तुषार गांधी म्हणाले ,’जाती व्यवस्था संपली नाही या विषयावर आज बोलावे लागत आहे ,हीच दुःखदायक गोष्ट आहे . आजही दलित ,मागास समाजावर अत्याचार -अन्याय होत आहेत . आरक्षणाला नावे ठेवली जात आहेत . प्रत्यक्षात दलितांचे शोषण होत असून त्यांच्या मतांची दलाली थांबली पाहिजे . दलितांवर होणारे अत्याचार थांबले नाहीत याला दलित राजकारणही कारणीभूत आहे . कोणत्याही एका समाजघटकावर अन्याय होताना इतर समाजघटक गप्प बसतात ,हेही धक्कादायक आहे ‘
डॉ मिलिंद आव्हाड म्हणाले ,’भारतातील जात व्यवस्था भांडवली दृष्टीकोनातून झालेली नाही ,तर ती धार्मिक संचितातून झालेली आहे . त्याचे ‘घेट्टोकरण ‘झाले असून ते विवेकाने तोडले पाहिजे . आजही दलितांवर अन्याय होत आहे ,बहिष्कृत समाजाचे ,महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत . काय खावे ,कसे वावरावे असे सांगणारा गंभीर काळ आला आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य ,खान-पान स्वातंत्र्य संपवले जात आहे ,अशा परिस्थितीत व्यापक परिवर्तनाचा पर्यायी मंच उभा केला पाहिजे . ‘
जिग्नेश मेवाणी म्हणाले ,’गुजरातमधील सबका साथ -सबका विकास ‘ ची कहाणी खोटी आहे . तेथील विकास दलितांना बरोबर घेत नाही . तेथे अदानी ,अंबानी याना पाहिजे एव्हडी जमीन मिळते ,पण दलित भूमिहीनांना सरकारने दिलेली १ लाख १७ हजार एकर जमीन प्रत्यक्षात ताब्यात मिळत नाही ,कारण तेथे सवर्णांनी अतिक्रमण केलेलं आहे . गांधी आणि आंबेडकर यांचे विचार घेऊन वर्णवर्चस्व वादी ,फॅसिस्ट विचारांविरुद्ध रस्त्यावर मोठा लढा उभारावा लागणार आहे .
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’जात विरहीत झाल्याशिवाय क्रांतीच्या गोष्टी बोलता येणार नाहीत . डोक्यात जात बसल्याने नवे महापुरुष ,क्रांतिकारक ,नवे विचार स्वीकारले जात नाहीत . अशा परिस्थितीत शांत राहणे हाच एक कट असून अहिंसक आक्रमकतेची गरज आहे ‘