नेहरू विचार जागविण्याची गरज – अॅड. राज कुलकर्णी
पुणे ः ‘भारतीय स्वातंत्र्य लढा हा मानवमुक्ती चळवळीतील एक भाग आहे ‘ असे सांगणारे पंडीत नेहरू यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आंतरराष्ट्रीयीकरण केले.नेहरूंविषयी काश्मीर-फाळणी, चीनसंदर्भात केली जाणारी टीका कुजबूज तथ्यहीन आहे. आजच्या संदर्भात ‘नेहरू विचार’ पुन्हा जागविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंडीत नेहरूंचे अभ्यासक अॅड. राज कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’ मध्ये आधुनिक भारताचे निर्माते-पंडीत नेहरू ‘या विषयावरील खुल्या संवादात ते बोलत होते.
गांधीभवन, कोथरूड येथे हा खुला संवाद झाला. अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी होते.
राज कुलकर्णी म्हणाले, ‘राष्ट्रवाद हा भूभागापुरता मर्यादित नसावा, तो जनतेशी निगडीत असावा, अशी पंडीत नेहरूंची भूमिका होती. आपल्या लिखाणातून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आंतरराष्ट्रीयकरण केले. भारतीय स्वातंत्र्य लढा हा जगातील मानवमुक्ती चळवळीचा भाग आहे, असे त्यांनी लिहिले होते. हिटलर, मुसोलिनी यांच्या भेटी त्यांनी टाळल्या, यावरून त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट होती, हे लक्षात येते.’
नेहरूंवरील आरोप हे तथ्यहीन आहेत असे त्यांनी सांगितले. भारतात न येणारा काश्मीर नेहरूंमुळे सामील झाला. त्यामुळे काश्मीरला 370 कलमासारख्या काही जास्तीच्या गोष्टी द्याव्या लागल्या. सिक्युरिटी कौन्सिलच्या सदस्यत्वाची ऑफर भारताला आलेली नव्हती. म्हणून भारत सदस्य बनू शकला नाही. त्यात नेहरूंना दोष देता येत नाही. चीनशी पंचशील करार 25 वर्षांचा व्हावा, असे त्यांचे मत होते. मात्र, तो आठच वर्षांचा झाला. हा करार संपल्यावर चीन लगेचच हल्ला करेल, असे कोणालाच वाटले नव्हते. तसेच ते नेहरू यांनाही वाटले नव्हते.
देशाची फाळणी देखील अगदी अपरिहार्य बनल्यानेच सर्वांनी स्वीकारली. मात्र, अनेक बाबतीत नेहरूंना जबाबदार धरण्याची फॅशन बनली आहे. तरीही नरेंद्र मोदींच्या काळातच लोक नेहरूंविषयी अधिक सजग होऊन वाचू लागले आहेत, ही उल्लेखनीय गोष्ट आहे.
यावेळी डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, संदीप बर्वे उपस्थित होते.