त्रैभाषिक मुशायऱ्याने जिंकली मने !
पुणे : कधी रोजचे जगणे अवघड करणाऱ्या महागाईवर गंमतीशीर टिप्पणी , तर कधी प्रेमाचा गुलकंद आठवत त्रैभाषिक मुशायराने रसिकांची मने जिंकली ! महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ निमित्त कोजागिरीचे औचित्य साधून हा मुशायरा आयोजित करण्यात आला होता.
प्रदीप निफाडकर, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी नझीर फतेहपुरी, जिया बागपती, सुमित पॉल, भाग्यश्री कुलकर्णी यांनी उर्दू, मराठी, हिंदीतून एकामागोमाग सुरेख गझला सादर केल्या
” कवी म्हणजे बोलका कवी, रसिक म्हणजे मुका कवी ”
असे सांगून निफाडकर यांनी उपस्थितांना विश्वासात घेतले.
” हा चंद्र , हे चांदणे, घेऊन जा तुमच्या घरी,
मुक्काम करते माझ्या घरी, रोज कोजागिरी ”
असा कवीचा आत्मविश्वास ही त्यांनी दाखवला.
डॉ.कुमार सप्तर्षी समोर पाहून
” हे उन्हाने वाळलेले पान आहे,
वृध्द नाही, अनुभवाचे रान आहे ”
या निफाडकरांच्या ओळी दाद घेऊन गेल्या.
” दाढी के बाल अब पकने लगे है,
हमे वो चाचा जान कहने लगे है “
अशी व्यथा सुमीत पॉल यांनी व्यक्त केली.
तर प्रचलीत परिस्थितीवर भाष्य करत जिया बागपतींनी शेर ऐकवला. ते म्हणाले..
” कद किसी का रहे चाहे गगन से उंचा,
कोई हो सकता नही, अपने वतन से उंचा !
भाग्यश्री कुलकर्णी यांनी या त्रैभाषिक मुशायरा मध्ये उर्दू , हिंदी कवीतील फरक सांगीतला
” उर्दू और हिंदी में फर्क है इतना,
वो देखते है ख्वाब , हम देखते है सपना “
नझीर फतेहपुरी यांनी अध्यक्षस्थानावरुन बहारदार गझला , दोहे ऐकवले. द्वेष नको प्रेम हवे, सांगताना ते म्हणाले…
” फुल को हार की जरूरत है,
यार को यार की जरूरत है,
नफरतों को हवा न दो भाई,
देश को प्यार की जरूरत है “
संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ.कुमार सप्तर्षी , डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन उपस्थित होते.