पुणे :पाश्चिमात्य आणि भारतीय सुरांचा संगम असणाऱ्या ‘सूर मिलाफ ‘ या कार्यक्रमाचे आयोजन ‘ढेपे वाडा ‘ (गिरीवन ,मुळशी ) येथे २७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले होते .
भारतीय संस्कृतीतील कला जोपासण्यासाठी तसेच वृद्धिंगत व्हावी यासाठी पूर्व आणि पश्चिमेकडील गायन आणि तालवाद्यांतील सुरांचा एक अनोखा मिलाफाचा कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आला होता . ‘उदय ईस्ट -वेस्ट फ्युजन बॅण्ड ‘ ने हा कार्यक्रम सादर केला .
झेक रिपब्लिक देशातील जॉन कॅन्कले ,( सॅक्सोफोन -बासरी ),विनीत अंतुरकर(गायन ,गिटार ) ,भूपाल लिमये (मेंडोलीन) ,नीरज प्रेम ( कॅनडा ) ,उदय रामदास (गायन ,तबला )या मिलाफ कार्यक्रमात सहभागी झाले .
जुन्या मराठी वाडा संस्कृतीप्रमाणे बांधलेल्या ढेपे वाड्याच्या आलिशान दिवाणखान्यात भारतीय बैठकीवर बसलेल्या रसिकांसमोर ही फ्युजन मैफिल रंगली . हंसध्वनी ,चारुकेशी ,खमाज या भारतीय रागदारीवर आधारित रचना सादर झाल्या . जॅझ ,वेस्टर्न क्लासिकल रचनाही या कलाकारांनी सादर केल्या . आफ्रिकन ,मराठी लोकसंगीतही रसिकांना मोहवून गेले . भैरवी रागाने मैफलीची सांगता झाली . या सर्व सादरीकरणाला रसिकमंडळींचा चांगला प्रतिसाद मिळाला .सूत्रसंचालन ऋचा ढेपे यांनी केले .
जॉन कॅन्कले म्हणाले ,’भारतीय संस्कृती आणि संगीत महान असून ढेपे वाड्यामुळे जुन्या एकत्रित कुटूंब पद्धतीचा प्रत्यय येतो . वेगळ्या वातावरणात या मैफलीचा आनंद वेगळाच होता . ‘नितीन ढेपे म्हणाले ,’संगीत आणि कलेला भाषा ,देशाच्या सीमा नसतात ,हेच या मैफलीमुळे सिद्ध झाले . अशा आगळ्या वेगळ्या संकल्पना ढेपे वाड्यात सादर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे .’ढेपे वाडा ‘चे संचालक नितीन ढेपे ,ऋचा ढेपे यांनी कलाकारांचा सत्कार केला .

