पुणे :” न किसी की ऒख का नूर हूं,न किसी के दिल का करार हूं,जो किसी के काम न आ सके,मै वो एक मुश्ते-गुबार हूं ‘ अशा वैफल्याच्या ओळी लिहिणारे ,मोगल साम्राज्याचा शेवटचे बादशहा ठरलेले बहादुरशहा जफर यांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत शोकांतिका आहे ‘ अशी खंत ज्येष्ठ उर्दू पत्रकार शमीम तारिक यांनी शुक्रवारी सायंकाळी व्यक्त केली .
शमीम तारिक यांनी प्रतिकूल ,विपरीत परिस्थितीत जगलेल्या ,मोगल साम्राज्याचा शेवटचा बादशहा ठरलेल्या बहादुरशहा जफर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला . अनेक प्रसंग जिवंत केले .
इंग्रजांनी बहादुरशहाला ‘पातशाह’ असा किताब देऊन त्याला नामधारी बादशहा बनवले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरामध्ये बहादूरशहा सामील झाला. क्रांतिकारकांनी इंग्रजांकडून दिल्ली काबीज केली व बहादूरशहास बादशहा म्हणून जाहीर केले.१३३ दिवसांनंतर दिल्ली पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेली. दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजांनी बादशहाला कैदेत टाकले. त्याच्या दोन मुलांची शिरे कापून ती त्याच्या समोर पेश करण्यात आली. त्यावेळी इंग्रजांचा एक हुजर्या बादशहाला म्हणतो,”दमदमाये में दम नही अब खैर मानो जान की ! ऐ जफर, ठंडी हुई अब तेग हिंदुस्थान की !!”
त्यावर उसळून डोळ्याचा अंगार फेकीत बादशहाने दिलेला जवाब पुढील ९० वर्षांचा क्रांतिकारकांचा इतिहास सांगणारा मंत्र ठरला. “गाजीयों में बू रहेगी जब तलक ईमान की ! तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की !!” (जो पर्यंत धर्मवीरांच्या हृदयात राष्ट्रनिष्टेचा सुगंध दरवळत राहील, तो पर्यंत हिंदुस्थानच्या समशेरीचे पाते लंडनच्या तख्ताचा रोख घेतच राहील.)
बादशहावर खटला भरून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. बहादुरशहाला ब्रह्मदेशातील रंगून येथे कैदेत ठेवण्यात आले. तेथील तुरूंगातच ७ नोव्हेंबर १८६२ साली त्यांचे निधन झाले.
आणि एक जिवंत शोकांतिका संपली .

