पुणे :गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ८ ८ व्या वाढदिवसानिमित्त ८८ ज्येष्ठ नागरिकांना ‘स्वरलता ‘ पुस्तकांची भेट देण्यात आली !पुण्यातील रिदम वाघोलीकर या युवा लेखकाने हा उपक्रम दीदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २७ सप्टेबर ,बुधवारी सायंकाळी केला.
महिला हिंदू अनाथाश्रम, निवारा, मातोश्री वृध्दाश्रम या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना , अनाथ महिलांना ‘ स्वरलता ‘ या पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आल्या.
हे अनोखे पुस्तक ग्रामोफोन डिस्कच्या आकारातील पहिले पुस्तक असून त्यात संगीत, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे लेख आहेत. रिदम वाघोलीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून रचना खडीकर -शहा अतिथी संपादक आहेत. लतादीदींच्या हस्तेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.
रिदम वाघोलीकर यांच्यासमवेत सुधीर वाघोलीकर, आशय वाघोलीकर, अनु वाघोलीकर, प्रतिक रोकडे आणि चैतन्य येरवडेकर हे देखील या उपक्रमात सहभागी झाले.
‘ लता मंगेशकर हे श्रद्धास्थान आहे.कलाकार म्हणून अद्वितिय, अलौकिक आहेत. त्यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करावा, अशी इच्छा त्यांचा चाहता म्हणून होती. या इच्छेपोटी ज्येष्ठांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम केला. सर्वच जण त्यामुळे खूप आनंदित झाले .लतादीदींच्या पुस्तकातील वाचनाने आनंद मिळावा हा उद्देश सफल झाला’ असे रिदम वाघोलीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
उद्या २८ रोजी ‘आभाळमाया ‘ वृध्दाश्रम सिंहगड रस्ता येथे सकाळी साडेदहा वाजता या पुस्तकांचे ज्येष्ठांना वाटप करण्यात येणार आहे.