आदिवासी जीवन संस्कृतीवरील छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन जागतिक आदिवासी दिनी ९ ऑगस्टला उद्घाटन
पुणे :
मुक्त छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांनी काढलेल्या देशातील १६ राज्यांमधील १२५ आदिवासीं जमातींच्या जीवनसंस्कृतीवरील छायाचित्रांचे आणि त्यांनी बनविलेल्या इको फ्रेंडली वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ ऑगस्ट रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत शोभा धारीवाल (‘रसिकलाल एम.धारीवाल फाऊंडेशन’च्या विश्वस्त) यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती ‘रिजनल अॅडव्हर्टाझिंग मार्केटिंंग असोसिएशन’ (‘रामा’)चे अध्यक्ष दिनकर शिलेदार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
‘रिजनल अॅडव्हर्टाझिंग मार्केटिंंग असोसिएशन’ (‘रामा’) आणि ‘बालमुद्रा डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर’ यांच्या संयुक्तविद्यमाने तसेच ‘रसिकलाल एम. धारिवाल फाऊंडेशन’ च्या सहाय्याने आयोजित हे प्रदर्शन दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०१७ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळात ‘राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी’, जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रोड येथे आयोजित केले गेले आहेे. प्रदर्शन विनामुल्य आहे. या प्रदर्शनात लांजिया सोरा आणि गोंड हे पुरस्कार विजेते आदिवासी कलाकार तांदळाच्या साळीच्या टरफलापासून गणपती, देवी बनविण्याच्या कलेचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने आदिवासींच्या ‘हेडगेअर्स’ आणि ‘टॅटू’ चे विविध पैलू पाहायला मिळणार असल्याचे श्री.परांजपे यांनी सांगितले. पूर्वा परांजपे यांनी छायाचित्रांना शीर्षक देण्याचे काम पाहिले आहे.
आदिवासींची पेंटिग्ज, मनोरंजक चित्रे तसेच इतर वस्तू, केन, बांबू, ‘पाम ट्री’ च्या पानापासून तयार केलेल्या वस्तू, सवाई ग्रास, गोल्डन ग्रास पासून बनविलेल्या छोट्या छोट्या वस्तू, ‘पेपर मॅश’ पासून बनवलेल्या वस्तू, प्रसिद्ध ढोकरा आर्टच्या वस्तू, मूर्ती अशा प्रकारच्या कोणतेही शिक्षण न घेता आत्मसात केलेल्या आदिवासी लोकांच्या कला या प्रदर्शनाद्वारे अनुभवायाला मिळणार आहेत.
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, नागालॅण्ड, अरुणाचल, मेघालय, जम्मू-काश्मीर, आसाम, केरळ, मिझोराम, मणीपूर, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक या प्रदेशात श्रीकृष्ण परांजपे जाऊन छायाचित्रण करून आले आहे. नक्षलवादी प्रदेशातही या छायाचित्राच्या निमित्ताने परांजपे यांनी भटकंती केली आहे. आदिवासींच्या विविध जमातींच्या जीवनशैली, रितीरिवाज, परंपरा, सद्यस्थिती या सर्व गोष्टींचे डॉक्युमेंटेशन व्हावे या ध्येयाने श्रीकृष्ण परांजपे कार्यरत आहेत. त्यांची छायाचित्रे ‘ट्रायबल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (पुणे) च्या सुवर्ण महोत्सवाच्या वेळी राष्ट्रपतींना भेट देण्यात आली होती.
श्रीकृष्ण परांजपे हे ३० वर्षे छायाचित्रणाच्या क्षेत्रात आहेत.लहान मुलांच्या चेहर्याच्या छायाचित्रणांचे ‘बालमुद्रा’ हे प्रदर्शन त्यांनी १५ वर्षे यशस्वी केले आहे. या अंतर्गत त्यांनी दीड कोटी छायाचित्रे काढली असून, ८ वर्षांपासून आदिवासी जनजीवनाची २५ लाखाहून अधिक छायाचित्रे काढली आहेत. आदिवासी भागात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या ट्रस्टच्या वतीने राबविलेले आहेत.
‘रामा’ ही जाहिरात एजन्सी २४ वर्षापूर्वी सुरू केलेली संस्था असून, त्यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रथमच सामाजिक कार्याचे भान ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, त्याला ‘आर.एम.धारिवाल फाऊंडेशन’च्या वतीने सहाय्य मिळाल्यामुळेच उपक्रम साध्य होणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांना भारतीय आदिवासींची जीवनशैली जवळून पाहता येणार आहे’, अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना ‘रामा’ (‘रिजनल अॅडव्हर्टाझिंग मार्केटिंंग असोसिएशन’) चे अध्यक्ष दिनकर शिलेदार यांनी दिली.