पुणे :’गांधीना मारल्यानंतरही त्यांचा, त्यांच्या विचारांचा भारतात निरंतर शोध सुरु आहे. त्यांनी राजकारणाला रणभूमी न करता नैतिकतेचे आंदोलन केले, भवतालच्या प्रत्येक समस्येला त्यांनी मानवतेचे कोंदण दिले ‘ , असे प्रतिपादन दिल्ली विश्वविद्यापीठातील प्राध्यापक अपूर्वानंद झा यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ निमित्त प्रा. अपूर्वानंद झा (प्राध्यापक, दिल्ली विश्वविद्यापीठ) यांनी ‘गांधी की खोज’ विषयावर व्याख्यान दिले.
हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी येथे झाला.
यावेळी व्यासपीठावर अन्वर राजन, संदीप बर्वे, मयुरी शिंदे, अप्पा अनारसे उपस्थित होते.
प्रा.अपूर्वानंद म्हणाले, ‘ महात्मा गांधी ही भारतीय दंतकथा आहे. त्यांना आपण महात्मा समजत असलो तरी एक राजकीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहायला हवे. त्यांनी राजकारणाला रणभूमी न करता नैतिकतेचे आंदोलन केले.
गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्यासाठी भारतीयांना जागे केलेच पण भारतीय स्वातंत्र्यलढयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवतेचा लढा असे स्वरुप दिले.
अस्पृश्यता विरोध, न्यायाचा शोध, हिंदू – मुस्लीम एकता हे त्यांच्या जगण्याचे महत्वाचे अंग होते. भवतालच्या प्रत्येक समस्येला ते मानवतेचे कोंदण देत होते. प्रत्येक वेळी ते
अंतरात्म्याचा आवाज ऐकत होते.
भारतीय नागरिक,अनुयायी,सहकाऱ्यांकडूनही ते कठोर योगदानाची अपेक्षा करीत. गांधीजींच्या स्वप्नात एक भारत होता, त्या भारताचा ते सतत शोध घेत होते.
अहिंसा ही रणनीती न मानता नीति म्हणून अंगीकारावी असा त्यांचा आग्रह होता.
गांधींजींनी स्वतःसाठी आणि भारतीयांसाठी निवडलेला उच्च नैतिकतेचा मार्ग अत्यंत खडतर होता, हेही त्यांच्या हत्येचे कारण होते का ? असा प्रश्न पडतो. सवर्णांचा क्रोध हेही त्यांच्या हत्येला कारणीभूत ठरले.
गांधीजींचे जीवन ही प्रयोगांची साखळी आहे. त्यात यश -अपयशाच्या पलिकडे बरेच काही आहे. गांधींचे अपयश हे त्यांची हाक न ऐकणाऱ्यांचेही अपयश आहे. गांधींचे अपयश आपले अपयश न मानणे , ही आत्मवंचना ठरेल, असेही प्रा. अपूर्वानंद यांनी शेवटी सांगीतले.

