पुणे :’२o१४ नंतर देशात अघोषित आणीबाणीचे वातावरण असून , नागरी स्वातंत्र्यांवर घाला येत आहे, या बेबंद सत्तेचा फटका प्रत्येकाला बसल्याशिवाय राहणार नाही, म्हणून सर्वांनी विरोधात लोकशक्ती उभी केली पाहिजे,प्रत्येकाच्या मनातील गांधी जागृत होऊन असंतोष व्यक्त होईल, तेव्हा हुकूमशाही भूईसपाट होईल ‘,
असे प्रतिपादन पत्रकार निखिल वागळे यांनी केले.
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ आयोजित ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ मध्ये ‘ अघोषित आणीबाणीचे आव्हान ‘ या विषयावर ते बोलत होते.
व्यासपीठावर डॉ.कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, संदीप बर्वे उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.
हा कार्यक्रम गांधीभवन येथे शुक्रवारी सायंकाळी झाला.
निखिल वागळे म्हणाले, ‘आजूबाजूची परिस्थिती श्वास कोंडावा अशी आहे. नागरिकांचे मूलभूत, घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. इंदिरा गांधींनी बहुमत वापरुन घटनात्मक मार्गाने आणीबाणी आणली, आणि नागरी स्वातंत्र्यावर आघात केला. तशी आणीबाणी आणणे आता नेत्यांना शक्य नाही.
आणीबाणीत माध्यमांनी अपवाद वगळता लढा दिला नव्हता, आताही माध्यमे अघोषित आणीबाणीत घाबरत आहेत. तेव्हाही अनेक आदरणीय मंडळी आणीबाणीयुक्त हुकूमशाहीच्या प्रेमात होती.आजही मध्यमवर्ग झोपलेला आहे. अवतीभवती काय घडते आहे, याची कल्पना त्याला येत नाही .
कॉंग्रेसच्या अनेक चुका घडत होत्या. मनमोहन सिंह राजकारणी म्हणून कमी पडले. म्हणून जनता मोदींच्या प्रेमात पडली.’स्ट्राँग ‘ वाटणारया नेत्याने प्रश्न सोडवले असते, तर हिटलरला आत्महत्या करावी लागली नसते.
अंबानी सर्व पक्षांच्या सरकारांबरोबर होते , या सरकारबरोबर देखील आहेत .इतके की,एक दिवस या देशाचे नाव ‘ अंबानी इंडिया ‘ झाले तर आश्चर्य वाटणार नाही .२०१४ ची निवडणूक मोदी, क्रोनी कॅपिटलिस्ट आणि मीडियाने लढवली.
मोदींच्या काळात पी. साईनाथ , वरद राजन, बॉबी घोष, पुण्यप्रसून वाजपेयी पासून अनेक पत्रकारांना राजीनामे द्यावे लागले. २०१३ नंतर मालक मंडळींचे संपादकांना भाजपा नेत्यांच्या मर्जीप्रमाणेे बदल केले.२०१४ नंतर चॅनेलमधील , वृत्तपत्रातील संपादक दबावाने बदलले गेले.
म्हणून असे वाटते की ,एक तरी रामनाथ गोएंका आजच्या काळात असायला हवा होता.
केवळ मोदीच नाही, तर फडणवीस पण सेन्सॉरशीप आणत आहेत. त्यांचे चॅनेलला फोन जात असतात. कॉंग्रेसच्या काळात दबाव येत असे, पण, ते नोकरीला हात लावत नव्हते. राणा अयूब, रवीश कुमार वर ट्रोलिंग होते. शिलाँगमध्ये संपादकाच्या घरावर पेट्रोल बॉंब टाकले गेले. काही पत्रकारांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल झाले. आता, पत्रकारांना सुरक्षितता राहिली नाही. आता ‘ प्रेस फ्रिडम ‘ नाही तर , ‘प्रेझ फ्रिडम ‘ आहे. ( स्तुतीचे स्वातंत्र्य आहे )
वायर, स्क्रोल सारखी पर्यायी माध्यमे, आणि समाज माध्यमांमुळे काही आशा आहे. पण, त्यावरही चीनसारखी बंधने येऊ शकतात.
ते पुढे म्हणाले, ‘कन्हैयाकुमार, उमर खालिद वर खोटे आरोप केले.अखलाख, मोहसिन शेख, जुनेद, रोहित ,भीम आर्मीचा प्रमुख चंदशेखर रावण यांचे नागरी स्वातंत्र्य कोणी हिरावले? रोहित वेमुलाला आत्महत्या करायला कोणी भाग पाडले.दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी,गौरी लंकेश मारेकऱ्यांना शिक्षा झाली का ? एकबोटेना जामीन मिळतो, आणि भिडे मोकळे जाते, हे कसे काय. ‘ प्लॉट टू किल पीएम ‘ चे पुराव्यांचे चार महिन्यात काय झाले ? न्या.धनंजय चंद्रचूड यांनी निकालपत्रात पुणे पोलिसांचे वस्त्रहरण केले आहे. तरी ‘ हा आमचा विजय आहे, असे तद्दन खोटे फडणवीस बोलत आहेत.
दोन ऑक्टोबरला शेतकऱ्यांचा आवाज बंद केला जातो.केंद्रीय मंत्रीमंडळ स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही.
पण, हा वैविध्य असलेला बहुपेडी देश असल्याने हुकूमशाहीने चालवता येणार नाही.
गांधींबद्दल बोलताना वागळे म्हणाले, ‘गांधी हे बदलाला तयार असलेले व्यक्तीमत्व होते.स्वतंत्र भारतात गांधीवादी, आणि गांधी विरोधकांनीही गांधींचा खून केला, पण तरीही गांधी संपले नाहीत. गांधींवर टीका करता येते, हे त्यांचे मोठेपण आहे. ‘